खरेदीला अवघा एकच दिवस; बाजारपेठ गर्दीने फुलली

Foto
सीजवार्ता

दिवाळीचा उत्साह शिगेला : सजावटीच्या वस्तूंनाही मोठी मागणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): दिवाळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी आता अवधा एकच दिवस शिल्लक राहिल्याने बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पूजेच्या साहित्यापासून ते नवीन कपडे, पणत्या, केरसुणी, जाते, तोरण आणि सजावटीच्या विविध वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे. विशेषतः नवीन कपडे खरेदी करण्यासाठी
ग्राहकांची सर्वाधिक पसंती दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू आहे. आता सण जवळ आल्याने या खरेदीला अधिकच वेग आला आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य, फुले, हार, पूजेची ताटे, दिवे, उदबत्ती, हळद-कुंकू यांसह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. दिवाळीच्या पारंपरिक खरेदीमध्ये पणत्या, केरसुणी आणि
जाते यांनाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजारात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. घराच्या मुख्य दरवाजाला लावण्यासाठी आकर्षक तोरण, रांगोळीचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि विद्युत रोषणाईच्या माळांना
मागणी आहे. नवीन कपड्यांना सर्वाधिक पसंती
दिवाळीच्या निमित्ताने नवीन कपडे खरेदी करण्याची परंपरा असल्याने कापड दुकाने आणि तयार कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. महिला, पुरुष
आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे कपडे खरेदी केले जात आहेत. विशेषतः कुटुंबासह बाजारात येऊन कपडयांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. सणासाठी नवीन कपडे घेण्याबरोबरच नातेवाइकांना भेटवस्तू देण्यासाठीही खरेदी केली जात आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी अनेकांनी शेवटच्या दिवसांची वाट पाहिल्याने आता बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू आहे.
मुख्य बाजारपेठांसह विविध भागांतील दुकानेही ग्राहकांनी गजबजली आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनीही दुकानांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूं सज्ज केले आहे.
इलेक्ट्रीकल माळा खरेदीची धूम
इलेक्ट्रॉनिक बाजारात खरेदीची धूम आहे. विविध प्रकारचे इलेक्ट्रीकल दिवे, माळा खरेदीला लगबग सुरू आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रीकल मोठ्या आकाराच्या माळा खरेदीवर भर दिला जात आहे.
बाजारात तीन ते चार लाख केरसुणी
दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असून, या पूजेमध्ये केरसुणीला धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा करून घरातील स्वच्छतेला आणि समृद्धीला महत्त्व दिले जाते. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत केरसुणी खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा शहरात जवळपास तीन ते चार लाख केरसुणी विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, अशी माहिती रेवन सोनवणे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली. बहुतांश केरसुणी मध्यप्रदेशातून मागविण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या कडेला तसेच बाजारपेठेतील दुकानांमध्ये केरसुणी विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांकडून घरगुती स्वच्छतेसाठी तसेच लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी खरेदी केली जात आहे. त्यामुळे सणाच्या खरेदीत केरसुणीचीही भर पडली आहे. दिवाळीच्या शेवटच्या टप्प्यात खरेदीला वेग आला असून, केरसुणी विक्रेत्यांनाही चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे.