एकत्र राहिलो तरच जगावर अधिराज्य करू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : उद्योजकांची बळीराजांना ६ कोटींची मदत
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो ): छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र आणून जुलमी शाह्यांविरुद्ध स्वराज्य उभे केले. ज्या काळात आदिलशाही, निजामशाही अन् कुतुबशाहीने संपूर्ण महाराष्ट्राला नामोहरम केले होते, अनेक राजे मुघलांचे मांडलिकत्व पत्करत होते, अशा काळात जिजाऊंच्या संस्कारांतून शिवरायांनी स्वराज्याचा पाया रचला. आपण विभाजित झालो, तर पुन्हा गुलामगिरीकडे जाऊ, जर एकत्र राहिलो, तरच जगावर अधिराज्य गाजवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने 'प्रौढ प्रताप पुरंदर' सात दिवसीय महानाट्याचा सांगता सोहळा संतशक्ती आणि राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले. व्यासपीठावर रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, देवगड संस्थानाचे प्रकाशानंद गिरीजी महाराज, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज, महंत शिवाजी महाराज, गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री या संतांसह पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आयोजक राजेंद्र साबळे व त्यांचे आई-वडील, देवराम पळसकर, शशांक दाभोळकर, विनोद पाटील, किशोर शितोळे आणि अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून आबालवृद्ध हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा आकर्षक पेहराव केला होता.
येथूनच घडणार भारताचे भावी पदकविजेते : मुख्यमंत्री
विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात भारतासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे ४०० मीटर सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट व युवा वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खा. संदिपान भुमरे, आ. सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्रीडाप्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण
महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करण्यात आलेल्या ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेसह महानगरपालिकेच्या विविध विकासप्रकल्पांच्या लोकार्पण शिलाफलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खा. संदिपान भुमरे, आ. सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बस नऊ मीटर लांबीच्या असून प्रत्येकी ३२ प्रवासी आसनांची व्यवस्था आहे. मनपाने पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
https:/lepaper.sanjwarta.in/Powered By Vrudhee















