उन्हाळी कांद्याला पहिल्याच दिवशी १ हजार २५० रुपयांचा भाव
गंगापूर, (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू वर्षातील मोकळा कांदा लिलावाला सोमवारी (दि. ६) सुरुवात झाली. कांदा लिलावाची सुरुवात बाजार समितीच्या सभापती अर्चना सुकासेव उपसभापती सचिन काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्याच दिवशी कांद्याला प्रति क्विंटल कमाल १२५० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
लिलावाच्या सुरुवातीला शेतकर्यांचा सत्कार करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सभापती अर्चना सुकासे यांनी शेतकर्यांना आवाहन केले की, कांदा प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, त्यामुळे दर्जेदार मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल.
शेतकर्यांनी आपल्या मालाची तोलणी व विक्री प्रक्रियेची पावती घ्यावी आणि शक्यतो रोख व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करावेत. काही अडचण आल्यास बाजार समिती कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी, असेही सुकासे यांनी म्हटले आहे.
उद्घाटन प्रसंगी बाजार समितीचे संचालक, व्यापारी, हमाल, मापाडीतसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. नव्या हंगामातील कांदा लिलावाला चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी दिवसांत कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.













