पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी; अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Foto
 मुंबई  : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार  यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्यानंतर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी प्रतिक्रिया याआधी अजित पवारांनी दिली होती. 

यानंतर आता अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात अजित पवारांवर देखील गंभीर आरोप होत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह विरोधकांनी केलेली आहे. त्यातच अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. 

भेटीत नेमकी काय चर्चा होणार? 

आपल्याला या व्यवहारासंदर्भात काहीही माहित नाही. आपला काही संबंध नाही, असे अजित पवारांनी याआधी सांगितले आहे. मात्र, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि त्यांच्या घरातच तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार होत असताना आपल्याला त्या संदर्भात माहिती कशी नाही? असा सवाल अजित पवार यांना विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरत आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?
 
1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले.