औरंगाबाद: निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतसा प्रचाराचा जोर वाढायला पाहिजे. पण औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मात्र युती-आघाडीतील मित्र पक्ष अधिकृत उमेदवारांना सहकार्य करीत नसल्याने उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
लोकसभेसाठी शिवसेना-भाजप-रिपाइं युतीतर्फे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. खैरे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये युती होण्यापूर्वी अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले. एकमेकांची उणी-दुणी काढण्यात आली. त्यामुळे दोन्ही पक्षात दुरावा निर्माण झाला होता. पण त्यानंतर मात्र युती झाल्याने उमेदवारी अर्ज भरताना सर्वजण एकत्र आले. सध्या खा. खैरे यांचा प्रचार सुरू आहे. पण या प्रचारात भाजपची बोटावर मोजण्या इतकी मंडळी खैरेंचा प्रचार करताना दिसत आहेत. भाजपचे बहुतांश स्थानिक नेते जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या खा. प्रीतम मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदार संघात प्रचारासाठी गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेता शिल्लक नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही प्रचारातून अंग काढून घेतले आहे. तशीच स्थिती काँग्रेस उमेदवार आ. सुभाष झांबड यांची झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे. राष्ट्रवादीचे आ. सतीश चव्हाण हे स्वतः या मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छित होते. पण काँगे्रसने राष्ट्रवादीला जागा दिली नाही. त्यामुळे सतीश चव्हाण यांचा हिरमोड झाला. आ. सुभाष झांबड यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसानंतर आ. चव्हाण यांनी शहर सोडले. सतीश चव्हाण सध्या उस्मानाबाद मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारात मग्न आहेत. त्यामुळे शहरातील कार्यकर्ते वार्यावर आहेत. सतीश चव्हाण यांनी सुभाष झांबड यांच्यासोबत असल्याचे सांगितले असले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र प्रचारापासून दूर आहेत.
मित्र पक्षातील स्थानिक नेते मंगळीच प्रचारासाठी अन्य जिल्ह्यात गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आहे. याचा फटका युतीचे चंद्रकांत खैरे व आघाडीचे सुभाष झांबड यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.