मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे नाही, असा टोला लगावला.
युतीची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ फिरत आहे. त्यात ते अल्लाह हाफीज म्हणत आहेत, त्यांनी मला या गोष्टी सांगू नये, असं म्हणत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. फक्त निवडणुका आल्यावर किंवा मतांच्या राजकारणासाठी भगवी शाल पांघरून फिरणारे आम्ही नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी माणूस यांच्यासोबत नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे पण त्यामुळे फार काही राजकीयदृष्ट्या घडणार नाही. पक्षाला निवडणुकीतील आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्षांनी अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली ही युती आहे. यामुळे फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. कारण मुंबईकरांचा सातत्याने या मंडळींनी विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे काम यांनी केले. मराठी माणूस यांच्यासोबत नाही. अमराठी माणसांवर हल्ले केल्याने तेही यांच्यासोबत नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे. आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. त्यांनी अजून दोन चार लोक सोबत घेतले तरी मुंबईकर हे महायुतीचे काम पाहून, भविष्यातील काम बघून महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मत मिळवण्याकरता त्यांन आपलं मत बदललं
"त्यांच्या मनात काय आहेत आणि ते कुठे लावत आहेत याचे मला देणंघेण नाही. अख्ख्या दुनियेला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला आणि हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत. फक्त मतांसाठी रोज मत बदलणारे आम्ही लोक नाहीत. आम्ही हिंदुत्वादी काल ही होतो आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेला मान्य आहे. मत मिळवण्याकरता त्यांन आपलं मत बदललं. नेहमीप्रमाणे पलटी मारली आहे. पण शेवटी जुनी पापं आहेत आणि ती लोकांनी बघितली आहेत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.