लॉकडाऊनमध्ये अडकले ‘बस थांबे’
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.येणार्या परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन त्यानंतरच शहर बससेवा सुरु करण्याबाबत निर्णय होईल ,असे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले तर लॉकडाऊन सुरु होण्याआधी स्मार्ट सिटी बस थांब्याची अर्धवट राहिलेली कामे सप्टेंबर अखेरीस पूर्ण होतील अशी माहिती स्मार्ट सिटीचे बस व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांजवार्ताशी बोलतांना दिली.
शहरात 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.150 ठिकाणी शहरात बसथांबे सुरु करण्याचे नियोजन होते. त्यामुळे अनेक ठिकाणी बसथांब्याची कामे अर्धवट राहिली होती.35 बसथांबे लॉकडाऊन पूर्वी संपूर्णपणे तयार होऊन वापरास सुरुवात करण्यात आली.जवळपास 70 बसथांब्याचे बेसमेंट तयार होते. मात्र लॉकडाऊनमुळे कंत्राटदाराने अहमदाबाद वरुन मागवलेले सुटे भाग येण्यास विलंब झाला.त्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन वाढतच गेले. त्यामुळे अद्यापही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.लवकरच अहमदाबाद वरुन माल येईल व सप्टेंबर पर्यंत काम पूर्ण होईल. तसेच उर्वरित 45 बसथांब्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.कोणाच्या दुकानासमोर, घरासमोर, बाजूला बसथांब्याचे नियोजन होते. शासकिय रस्त्यांवर, मुख्य रस्त्यांवर नागरिक बसथांब्याना विरोध करत आहेत.हे प्रकरणे निकाली लागल्यानंतरच उर्वरित बसथांब्याची कामे सुरू होतील. अशी माहिती स्मार्ट सिटी बस व्यवस्थापकांद्वारे देण्यात आली.
शहर बससेवा सुरू होण्यास वेळ
शासनाने एसटी बसेस सुरु करुन तसेच ई-पासची अट रद्द करण्याबाबत निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा दिला आहे.पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे.मुंबईतही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या दृष्टीने शहर बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र औरंगाबाद शहर बससाठी नागरिकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.लॉकडाऊन जाहिर होताच मार्च अखेरीस स्मार्ट सिटी बस सेवा बंद झाली.या बसेस कोरोना रुग्णांची ने- आण करण्यासाठी वापरण्यात येत आहेत.
अजूनपर्यंत शहर बससेवा सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. आमची संपूर्ण तयारी आहे. जेव्हा वरतून आदेश येतील त्यानंतर स्मार्ट सिटी बस सुरू करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. तसेच 70 ठिकाणी बसथांबे अर्धवट तयार आहेत. या महिन्यात हे थांबे पूर्णपणे तयार होतील.
- प्रशांत भुसारी,
स्मार्ट सिटी बस व्यवस्थापक