पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांकडून आज पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना भेडसावणार्या विविध अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना होत आहे. यात महाविकास आघाडीचे अनेक नेते देखील सहभागी झाले आहेत.
मएमपीएससीफ च्या माध्यमातून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचार्यांची भरती केली जाते. मात्र, गेल्या काही काळापासून परीक्षा प्रक्रिया, भरतीतील विलंब, परीक्षांशी संबंधित अडचणी आणि इतर प्रश्नांमुळे विद्यार्थी नाराज असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
पेपरफुटी, परीक्षा वेळापत्रक, भरती प्रक्रिया, निकाल, विविध परीक्षांशी संबंधित प्रश्न तसेच विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी यांसारखे अनेक विषय प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
आजच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मएमपीएससीफ ची तयारी करणारे विद्यार्थी सहभागीझाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही राजकीय नेतेदेखील मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांकडून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले जाईल. दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते आणि या मोर्चानंतर प्रलंबित मागण्यांबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे आता विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
सरकारला धडा शिकवला जाईल : रोहित पवार
मएमपीएससीफ च्या शुद्धीकारणाशिवाय हा लढा थांबणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आजचा हा आक्रोश मोर्चा आहे. या मोर्च्यात कुठलंही राजकारण नाही, समाजकारण आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सरकारला विनंती आहे, यात कुठलंही राजकारण नाही, त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा. आयोगाच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यामुळे त्यांना आणि संबंधित दोषी अधिकार्यांना बाजूला करून स्वच्छ करावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तक्रार दाखल होत असेल तर चौकशी होऊन कारवाई का होत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्य घडवणार्या परीक्षेत भ्रष्टाचार होत असेल तर विद्यार्थी शांत बसणार नाही, सरकारला यातून नक्कीच धडा शिकवला जाईल असेही आमदार रोहित पवार म्हणाले.