भरदिवसा ओव्हरलोड वाळू – मुरूम वाहतूक; प्रशासनाच्या कारवाईकडे दुर्लक्ष?

Foto
 लिंबेजळगाव दहेगाव बंगला, पेंढापूर शिवारातून नंबरप्लेट नसलेल्या डंपरची सर्रास वाहतूक; दुचाकीस्वार त्रस्त

गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव, दहेगाव बंगला, व पेंढापूर शिवारातून भरदिवसा वाळू व मुरूमाची वाहतूक करणारे ओव्हरलोड डंपर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूजलिंबे जळगावदहेगाव बंगला या मार्गावरून सर्रास धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही डंपरवर नंबरप्लेट नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे असून, क्षमतेपेक्षा अधिक वाळू-मुरूम भरून वाहतूक केली जात असल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न
निर्माण झाला आहे.

या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी व लहान वाहने ये-जा करतात. मात्र, ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने जात असताना त्यातून माती व वाळू रस्त्यावर तसेच हवेत उडत असल्याने दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत धूळ जाणे, कपड्यांवर माती उडणे आणि वाहन चालविताना अडचणी निर्माण होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लहान वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. डंपरवर नंबरप्लेट नसणे, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणे तसेच वाहतुकीदरम्यान वाळू मुरूम झाकून न नेणे, या बाबींकडे संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पेंढापूर शिवारातून सुरू असलेल्या या वाहतुकीवर आरटीओ विभाग आणि गंगापूर तहसील प्रशासनाने संयुक्तपणे तपासणी करून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

तसेच वाळू-मुरूम वाहतुकीसाठी संबंधित वाहनांकडे आवश्यक परवाने आहेत का, वाहनांची क्षमता, नंबरप्लेट व वाहतुकीचे नियम यांची तपासणी करण्याची मागणीही करण्यात येत आहे. भरदिवसा सुरू असलेल्या या वाहतुकीकडे संबंधित विभागांचे लक्ष कधी जाणार आणि नियमबाह्य डंपरवर कारवाई कधी होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.