पैठण येथील ७०० कामगारांची पीएफची रक्कम थकीत

Foto
संत एकनाथ सचिन घायाळ शुगरच्या विरोधात कामगार संतप्त  

अनेक प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित

पैठण, (प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील संत एकनाथ सचिन घायाळ या सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना १८ वर्षाच्या भागीदारी तत्त्वावर सचिन घायाळ शुगर यांनी चालविण्यास घेतलेला आहे. सचिन घायाळ शुगर यांनी कारखान्यातील कामगारांचा २०१४ पासून भविष्य निर्वाह निधी पीएफ नियमितपणे भरला नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत असून, निवृत्त झाल्यानंतर आपल्या हक्काच्या पैशासाठी अनेक कामगार गेली अनेक वर्षे न्यायालयीन लढा देत आहेत.

कामगारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पगारातून पीएफ रक्कम कपात केली जात होती मात्र ती संबंधित खात्यात जमा करण्यात आली नाही किंवा अनेक वर्षे प्रलंबित राहिली. त्यामुळे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या महत्त्वाच्या निधीपासून अनेक कामगार वंचित राहिले आहेत. आपल्या आयुष्याची जमापुंजी परत मिळवण्यासाठी कामगारांनी कामगार आयुक्त संभाजीनगर, पुणे, मुंबई पर्यंत हेलपाटे घातले आहेत परंतु संबंधित आयुक्तांनी कारखान्याच्या चेअरमन यांच्यासोबत अर्थपूर्ण हात मिळवणी करून कामगारांचे पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. 

---न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव ---
कारखाना प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अनेक कामगार आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी मुंबई खंडपीठ संभाजीनगर येथे धाव घेतली. या ठिकाणी कामगारांना अद्याप पर्यंत न्याय मिळाला नाही. अनेक प्रकरणे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.

-- शेकडो कुटुंबांवर परिणाम --
पीएफ हा कामगारांच्या भविष्याचा आर्थिक आधार मानला जातो. मात्र पीएफ थकीत राहिल्याने शेकडो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. काही निवृत्त कामगार आजही आपल्या हक्काच्या पैशासाठी संघर्ष करत असल्याचे सांगितले जाते.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे निर्णय लांबत चालल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
संत एकनाथ सचिन घायाळ शुगर यांनी कामगारांचे पीएफचे पैसे जमा केले नसल्याने संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी व जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना सोबत घेऊन दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर यांनी २०२२ ते २०२६ पर्यंत कामगारांचा किती पीएफ भरला तसेच विविध मुद्द्यावर माहिती देण्याची मागणी केली आहे.