छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि मुलाची सुटका करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (४१) आणि पोलीस अंमलदार सुभाष छगन राठोड (३६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. ८) रात्री रंगेहाथ अटक केली. न्यायालयाने दोघांना बुधवारी (दि. ९) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी याच पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे आणि अंमलदार गोकुळ खटावकर
यांनाही अशाच प्रकरणात आरोपीकडून लाच घेताना अटक झाली होती.
४२ वर्षीय महिला तक्रारदार आणि त्यांच्या दोन मुलांवर सिडको चौकात रिक्षाचालकांवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आणि शेजाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हा दाखल आहेत. गुन्ह्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रशांत पासलकर होते, तर सुभाष राठोड हे त्यांना मदतनीस
म्हणून काम करत होते. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि तक्रारदार महिलेच्या मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी पासलकर आणि राठोड यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी ७ सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली. त्याच दिवशी एसीबीने ठाण्यात जाऊन पडताळणी केली. त्यावेळी पीएसआय पासलकर यांच्या समक्ष अंमलदार राठोड याने १० हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपये स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले. ही कारवाई एसीबीच्या अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे, सिनकर आणि तोडकर यांच्या पथकाने केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













