पद्मसिंह पाटील यांच्यासह पवनराजे खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Foto
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणार्‍या आणि गेल्या दोन दशलकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज (२० जून २०२६) अंतिम निकाल लागला आहे. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे.

सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्र. ५५ मध्ये ही ऐतिहासिक सुनावणी पार पडली. बिहारच्या तुरुंगात असलेला मुख्य शूटर पिंटू सिंग याला पोलिसांनी उशिरा हजर केल्यामुळे काही काळ सस्पेन्स वाढला होता. तो न्यायालयात हजर होताच, कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयाने निकालवाचनाला सुरुवात केली.

न्यायमूर्तींचे सविस्तर निकालवाचन 
न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी निकालपत्राचे वाचन करताना तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावर आणि पोलिसांच्या चुकांवर अत्यंत गंभीर बोट ठेवले. न्यायाधीशांचे सविस्तर निकालवाचन खालीलप्रमाणे होते. "२० वर्षांनंतर मी हा निकाल देतोय, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की एका लोकनेत्याची अशा प्रकारे कळंबोली येथे गोळीबार करून हत्या होते. सुरुवातीला कळंबोली पोलीस, नंतर नवी मुंबई गुन्हे शाखा आणि अखेर सीबीआयकडे हा तपास गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने खटला या कोर्टात आला. या प्रकरणात १२७ साक्षीदार तपासले गेले. न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निकाल देत आहे."

पोलिसांची घोडचूक अन् तपासाचा पायाच ठिसूळ
न्यायालयाने म्हटले की, "हा खटला पूर्णपणे माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर उभा आहे. जैनच्या म्हणण्यानुसार गुन्हे शाखेने त्याला ८ सप्टेंबर २००९ रोजी मुंब्रा येथून ताब्यात घेतले, मात्र त्याला अधिकृत अटक २५ सप्टेंबर दाखवली. या दरम्यान त्याला १५ दिवस बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण करण्यात आली, औषधे बंद केली आणि कबुलीजबाब घेतला. हा पहिला जबाब कायद्याला धरून नव्हता आणि सरकारी पक्षाने ही माहिती न्यायालयाला न सांगून मोठी घोडचूक केली, ज्यामुळे हा पुरावा संशयाच्या खाईत ढकलला गेला. दोन्ही जबाबात मोठी तफावत आहे."

माफीच्या साक्षीदाराने पैशांच्या नडणुकीमुळे हा गुन्हा केल्याचा दावा केला होता, जो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती म्हणाले, "साक्षीदाराचे मुंबई, नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथे अनेक घरे आणि मिठाईची दुकाने आहेत. त्याच्याकडे साडेचार किलो सोन्याचे भांडवल आहे. त्याचा कुठलाही उद्योग डबघाईला आलेला नव्हता. अशा परिस्थितीत त्याला केवळ ५० हजार रुपयांची गरज होती म्हणून त्याने एवढी मोठी हत्या केली, हे अजिबात पटणारे नाही. त्याला सोयीनुसार खोटं बोलण्याची सवय आहे."

राजकीय दरी मान्य, पण पुराव्यांचा अभाव; सर्व आरोपी मुक्त
न्यायालयाने मान्य केले की, २००२ नंतर पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात तेरणा साखर कारखाना आणि निवडणुकीतील पराभवामुळे मोठी राजकीय दरी निर्माण झाली होती. पूर्ववैमनस्यातून हत्येचा कट रचल्याचा सीबीआयचा आरोप होता आणि पवनराजेंनी जीवाला धोका असल्याचे पत्रही जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. मात्र, केवळ राजकीय वैमनस्य आहे म्हणून कोणाला फासावर लटकवता येत नाही, त्यासाठी कायद्याला ठोस पुराव्यांची गरज असते.