पैठण, (प्रतिनिधी): पैठण नगर परिषदेच्या एक नगराध्यक्ष व २१ सदस्य निवडीसाठी ७३. ७४ टक्के मतदान झाले. एकूण ३७ हजार८०५ मतदारापैकी २७हजार ८७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष १४ हजार ३१६ तर १३ हजार ५६१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून नगराध्यक्ष पदासाठी ६ तर सदस्य पदासाठी ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
या निवडणुकीसाठी ४४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी दहा वाजेपर्यंत थंडी असल्यामुळे मतदारांची टक्केवारी अत्यंत कमी होती. मात्र अकरा वाजे नंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. दरम्यान दहा मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र निवडणूक
निर्णय अधिकारी नीलम बाफना, अतिरिक्त निवडणूक अधिकारी ज्योती पवार, सहायक निर्णय अधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांनी वीस मिनिटात या ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पाठवून त्या सुरू केल्या. नवीन ईव्हीएम मशीन बसवण्यात आल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.
दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. किरकोळ बाचाबाची चे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
दरम्यान संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे, राजू भुमरे, शिवराज भुमरे, नंदलाल काळे, नंदू पठाडे, बाबुराव पडूळे, विनोद बोंबले, हे मतदान संपेपर्यंत शहरात तळ ठोकून होते. त्यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी दिल्या तसेच विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल पटेल, दत्ता गोर्डे यांनी सुद्धा शहरातील विविध मतदान केंद्रावर भेटी दिल्या. पहिला मतदानाचा हक्क बजावणारी युवती, ९० वर्षाचे वयोवृद्ध यांनी मतदानाचा हक्क बजावला.















