लोळगे, कावसनकर, गोर्डे, जोशी, पंडुरे यांचा समावेश
पैठण, (प्रतिनिधी) : पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १२२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १० नोव्हेंबर ते १७नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी १४ तर नगरसेवक पदासाठी २८९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षातर्फे दावा करण्यात आला असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. सर्वच पक्षा तर्फे युती करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाने निष्ठावंत शिवसैनिकांना डावलण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत १२ नामनिर्देशन कक्ष प्रभागा पैकी फक्त दोन प्रभागात ४ जागेवर युती केली आहे. शिंदे गटाच्या काही दळभद्री पदाधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण सौदेबाजी करून चुकीचा सर्वे करून अहवाल वरिष्ठाकडे पाठवून निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय केला आहे.
इतकेच नव्हे तर अनेक प्रभागात जुन्या शिवसैनिकांना डावळून ऐनवेळी बाहेरून आलेल्यांना शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे, धक्कादायक प्रकार म्हणजे पैठण शहरात ज्या वार्डात शिवसेनेची पहिली शाखा उघडली. त्या जैनपुरा वार्डातील शिवसेनेकांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे या भागातील शिवसैनिक संताप झाले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गट व इंदिरा काँग्रेस पक्षाची युती होण्याची शक्यता असून दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी संपर्क साधताना दिसत आहे.
दरम्यान भाजपा तर्फे मोहिनी सुरज लोळगे, उबाठा तर्फे अर्पणा दत्ता गोर्डे, शिवसेना शिंदे गटा तर्फे विद्या भूषण कावसानकर, इंदिरा काँग्रेस पक्षातर्फे सुदैवी योगेश जोशी, राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे अनिता उमेश पंडुरे, यांचा समावेश आहे. असे असले तरी २१ नोव्हेंबर हि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने या नंतर कोण निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहे हे स्पष्ट होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पैठण फुलंब्री च्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे तसेच तहसील व नगरपरिषदेचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.














