पैठण आगाराचे वेळापत्रक कोलमडले आगर प्रमुखाचे दुर्लक्ष, प्रवाशांमध्ये संताप

Foto
पैठण, (प्रतिनिधी): बस आगारातून लांब पल्ल्याच्या बस गाड्या कधीही वेळेवर सोडल्या जात नाहीत. एक ते दोन तास उशिरा गाड्या सोडल्या जात आहेत. सकाळी चालक, वाहक हे कधीही वेळेवर आगारात हजर होत नाहीत. गाड्या उशिरा सोडण्याचे कारण कधी वाहक आहे तर चालक नाही. चालक आहे तर वाहक नाही असा प्रकार दररोज सुरू असतो. काही चालक, वाहकांना तर घरी जाऊन आणावे लागते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज २९ ऑक्टोबर बुधवारी रोजी सकाळी ६ वाजता सुटणारी पैठण पुणे ही बस जवळपास एक तास उशिरा म्हणजे ७वाजता निघाली. सकाळी लवकर बस लागेल म्हणून प्रवासी बस स्थानकात येऊन बसतात.

आज बुधवारी सकाळी पाऊस सुरू असताना प्रवासी पावसाची तमा न बाळगता बस स्थानकात साडेपाच वाजेपासून बसची वाट पहात बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर पावसात उभे होते. परंतु बस पाऊण तास उशिरा ६:४५ वाजता प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. व ७ वाजता रवाना झाली. नुसती पुणे गाडी नाहीतर लांब पल्ल्याच्या जवळपास सर्वच गाड्या उशिरा सोडल्या जात आहेत अशा प्रकारे मनमानी पद्धतीने या पैठण आगाराचा कारभार सुरू आहे. चौकशी कक्षही उशिरा उघडते
प्रवाशांना माहिती देण्यासाठी उघडण्यात आलेले चौकशी कक्ष हे कधीच वेळेवर उघडे नसते सहा ते साडे सहा वाजेपर्यंत चौकशी कक्षात कोणीही नसते. यामुळे प्रवाशांना कोणती गाडी कधी निघेल हे समजत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा अशी मागणी प्रवाशातून होत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
आगार प्रमुखाला लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद

आगार प्रमुख मडके हे स्थानिक असल्यामुळे व त्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांची मनमानी सुरू आहे. पैठण आगरातील आगार प्रमुख सह कर्मचारी हे मनमानी कारभार करत असल्याचे दिसत आहे या संदर्भात प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतानाही लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. यामुळे मात्र प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
लांब पल्ल्यावर जुन्या गाड्या : 
पैठण आगारासाठी जवळपास २० नवीन बस गाड्या आलेल्या आहेत. परंतु या नवीन बस गाड्या लांबच्या प्रवासासाठी सोडल्या जात नाहीत. पुणे मुंबई साठी जुन्याच गाड्या सोडल्या जातात. वास्तविकता व्यापारी व प्रवाशांची पुणे मुंबई साठी नवीन गाड्यांची मागणी असतानाही आगारप्रमुख याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

प्रवासी नसताना रिकामा धावतात बस
सकाळी पैठण संभाजीनगर, पैठण जालना, या मार्गावर धावणाऱ्या बस गाड्या मध्ये एक ते दोन प्रवासी असतात. प्रवाशांची वाट न पाहता वाहक चालक हे रिकामी बस घेऊन जातात यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहेत.

बोर्डावरचे वेळापत्रक बदलले नाही 
अनेक बस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेल्या वेळा पत्रकावरील बदलाची दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे प्रवाशी हे बस स्थानकात लावण्यात आलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे बस पकडण्यासाठी बस स्थानकात येतात परंतु एकतर बस गाड्या आधीच निघून गेलेल्या असतात किंव्हा उशिरा धावतात याबाबत चौकशी कक्षात विचारणा केल्यास गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे असे उत्तर दिले जाते.