पैठण, (प्रतिनिधी): पैठण येथील संत नगर परिसरातून विवाहाच्या उद्देशाने पळवून नेलेल्या मुलीचा शोध लावण्यात पैठण पोलिसांना अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून पीडित मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
घटनेची पार्श्वभूमी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडित मुलीस मुख्य आरोपी व त्याच्या एका साथीदाराने संगनमत करून, विवाहाच्या किंवा अन्य अनैतिक कारणासाठी बळजबरीने पळवून नेले होते. या घटनेमुळे परिसरात तसेच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२), १३८, ८७, ११५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-- तपासाची चक्रे आणि कारवाई --
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी तात्काळ चार पथके तयार करण्यात आली. या पथकांनी महाराष्ट्र आणि शेजारील राज्यात समांतर तपास सुरू केला.
पोलिसांनी जालना, पुणे, मुंबई, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि थेट मध्य प्रदेशपर्यंत जाऊन धाडसत्र राबवले.
-- तांत्रिक मदत --
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या
आधारे पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढले. व यशः अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तपास करून केवळ ४८ तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले आणि मुलीची सुखरूप सुटका केली.
-- तपास पथक --
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, जनाबाई सांगळे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, ऋषिकेश तळेकर, तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र जिवडे, कल्याण ढाकणे, योगेश तरमाळे, विलास सुखदान, अंकुश शिंदे, कृष्णा दुबाले, संतोष तोडकर, राहुल बल्लाळ, संतोष खिळे आणि महिला अंमलदार रंजना सूर्यवंशी, सुजाता बराटे, कोमल कोतकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर हे करत आहेत.













