पैठण पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई

Foto
पाच हायवा जप्त, तब्बल १ कोटी ५० लाख ५० हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पैठण (प्रतिनिधी): गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पैठण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तुळजापूर शिवारात गोदावरी नदीकडे जाणाऱ्या मायनर तीनचारी रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून पाच हायवा वाहने आणि अंदाजे पाच ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजेच्या सुमारास तुळजापूर शिवारात गोदावरी नदीकडे जाणाऱ्या मायनर तीनचारी रस्त्यावर पाच हायवा वाहनांमधून विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच संबंधित वाहनचालकांनी वाळू रस्त्याच्या बाजूला खाली टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

या कारवाईत अकतर अफसर शेख (वय ३६, रा. भांबेरी, ता. अंबड), रामेश्वर दत्ता पाचुंदे (वय ३७, रा. गुंडेवाडी, ता. अंबड), प्रवीण शांताराम बीळे (वय २८, रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर), समीर सुभाण शेख (वय २८, रा. चन्नापुरी, ता. अंबड) आणि सलमान समीद पठाण (वय २९, रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्येक हायवा ची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असून पाच वाहनांची किंमत १ कोटी ५० लाख रुपये आहे.

 याशिवाय अंदाजे पाच ब्रास वाळूची किंमत २५ हजार रुपये असल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५० लाख ५० हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलीस फिर्यादी राजेंद्र पोपट जिवडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग हे करीत आहे.