पंढरीच्या वारीचा खडतर प्रवास; पालखी मार्गाचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट, वारकऱ्यांमध्ये संताप

Foto
रमेश लिंबोरे
पैठण (प्रतिनिधी): आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पैठण यातून श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सात जुलै रोजी झाले आहे. परंतु पैठण तालुक्यातून जाताना या पालखीसोबत जाणाऱ्या वारकरी भाविकांना चिखल तुडवत जावे लागत आहे. 

यामुळे गावाच्या विकासाच्या गप्पा करणाऱ्या पुढाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. श्री संत एकनाथ महाराजांची पालखी चनकवाडी येथे मुक्काम करून आठ जुलै रोजी जुने दादेगाव हनुमान वाडी मार्गाने जात असताना या पालखीतील वारकरी भाविकांना गुडघे इतके खोल खड्यातून व चिखलातून मार्ग काढून जावे लागत असल्याने वारकरी भाविकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

गावाचा विकास केल्याची वल्गना करणाऱ्या पुढार्यांचे यामुळे विकास कामांचे पितळ उघडे पडले आहे. दादेगाव जुने व नवीन या गावाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे परंतु हे सर्व कागदावरच दिसत आहेत. पंढरीच्या वारीसाठी लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पायी मार्गक्रमण करत असताना, पालखी मार्गाचे अनेक वर्षांपासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण न झाल्याने वारकऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. खड्डेमय रस्ते, धुळीचे साम्राज्य, चिखल आणि अपुऱ्या सुविधांमुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रवासादरम्यान अनेक वारकऱ्यांच्या पायांना फोड येणे, धुळीमुळे श्वसनाचा त्रास होणे, तसेच पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने चालणे कठीण होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरीही विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ कायम ठेवत वारकरी भक्तिभावाने प्रवास सुरू ठेवत आहेत.

वारकऱ्यांनी पालखी मार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याबद्दल संताप व्यक्त केला. दरवर्षी वारी येते, पण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. दरवर्षी काम लवकर पूर्ण होईल असे आश्वासन राजकीय पुढारी देत आहेत. लाखो वारकऱ्यांचा विचार करून पालखी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी अनेक वारकऱ्यांनी केली. दरम्यान, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अन्न, वैद्यकीय सेवा आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. 

प्रशासनानेही आरोग्य, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी विविध उपाययोजना केल्या असल्या, तरी पालखी मार्गाचे अपूर्ण काम हा वारकऱ्यांसाठी यंदाही मोठा प्रश्न ठरत असल्याचे चित्र आहे.

श्रद्धा, भक्ती आणि संयमाच्या बळावर लाखो वारकरी सर्व अडचणींवर मात करत विठुरायाच्या भेटीसाठी पुढे सरकत आहेत. मात्र, पालखी मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ करावा, अशी अपेक्षा वारकरी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.