सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तान बरळला, दिला थेट हल्ल्याचा इशारा !

Foto
इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना भारताला धमकी देताना  म्हटले आहे की, जर भारताने फॉल्स फ्लॅग ऑपरेशन (खोटे षडयंत्र) केले, तर संघर्ष सीमेपुरता मर्यादित न राहता कोलकातापर्यंत पोहोचू शकतो. दरम्यान ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, भारत आपल्याच जवानांचा किंवा ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा वापर करून एक खोटे नाटक रचण्याची योजना आखत आहे. यावेळी भारताला गेल्या वर्षीपेक्षाही मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागेल. आसिफ पुढे म्हणाले की, कुठेही मृतदेह ठेवून पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप केला जाऊ शकतो, परंतु त्यांनी (भारताने) या दाव्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही.
ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच म्हटले आहे की, भारत आणि अफगाण तालिबान सरकार संयुक्तपणे पाकिस्तानविरोधात छद्मयुद्ध लढत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानवरील हल्ल्यांबाबत नवी दिल्ली आणि काबूल यांचे विचार एकसारखेच आहेत. आसिफ यांनी म्हटले आहे की, गरज पडल्यास पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये पुन्हा कारवाई करू शकतो. जर अफगाणिस्तानने शांततेची ठोस हमी दिली नाही, तर पाकिस्तान तिथे नवीन हल्ले करण्यास मागेपुढे पाहणार नाही. आसिफ यांनी असेही म्हटले आहे की, भारतासोबत युद्धाची शक्यता अजून संपलेली नाही.

मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करावा
पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्तांनी मुंबई आणि दिल्लीवरील हल्ल्यांबद्दल भाष्य केले होते. यापूर्वी, पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनीही एक वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर  पाकिस्तानने क्षणाचाही विचार न करता मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करावा. बासित म्हणाले, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आम्ही अमेरिकेपर्यंत पोहोचू शकत नाही कारण ते आमच्या अणु-पल्ल्याच्या बाहेर आहे. मग आमच्यासमोर काय पर्याय असेल? भारत. पुढे काय होते ते पाहू. ते असेही म्हणाले की ही एक अत्यंत वाईट परिस्थिती आहे, जी घडण्याची शक्यता कमी आहे, परंतु जर पाकिस्तानला कोणताही धोका निर्माण झाला, तर भारतावर हल्ला करणे हा पाकिस्तानचा पर्याय असेल.

पहलगाम हल्ल्यामुळे तणाव वाढला
२२ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाले. यानंतर, भारताने मऑपरेशन सिंदूरफ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. पाकिस्ताननेही तोफखाना, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांमधील तणाव चार दिवस टिकला, ज्यामुळे १० मे, २०२५ रोजी युद्धविराम झाला.

ऑपरेशन सिंदूरमध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त
भारताने ७ मे रोजी पहाटे १:३० वाजता पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारताने कोटली, बहावलपूर, मुरीदके, बाग आणि मुझफ्फराबाद येथे हल्ला केला. यामध्ये लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरच्या तळाचा समावेश होता.