छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मिझोरम राज्याच्या
दौऱ्यासाठी दिल्लीहून आइजोलकडे खाना झालेल्या इंडिगोच्या ६ई २९१ या विमानातील एका प्रवाशाची प्रवासादरम्यान प्रकृती गंभीर झाली. आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी डॉक्टर भागवत कराड यांनी प्रवाशाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावत त्यांनी प्रवाशाला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
विमान प्रवास सुरू असताना संबंधित प्रवाशाला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. डॉ. कराड यांनी उपलब्ध वैद्यकीय सुविधांच्या मदतीने प्रवाशावर प्राथमिक उपचार केले. त्याला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमांतून देण्यात आला. विमान आइजोल विमानतळावर पोहोचल्यानंतर संबंधित प्रवाशाला ऑक्सिजनच्या सुविधेसह तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर पुढील उपचारांची व्यवस्था करण्यात आली. विमानासारख्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी दाखवलेली तत्परता आणि वैद्यकीय कर्तव्यभावनेमुळे प्रवाशाला वेळेत उपचार मिळून त्याचे प्राण वाचले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













