रेल्वे नियमांकडे प्रवाशांनी फिरवली पाठ

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : रेल्वेने प्रवास करताना सर्वांनी काळजी घ्यावी, अशा सूचना वारंवार रेल्वे विभागाच्या वतीने दिल्या जातात. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने सूचना, जनजागृती आणि कारवाई केली जात असली तरी अनेक प्रवासी नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे. नियम पाळण्याऐवजी प्रवाशांकडून रेल्वेच्या नियमांकडेच पाठ फिरवित असल्याचे दिसून येते.
रेल्वेने प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा, चालू रेल्वेत दारात उभे राहू नये किंवा बसू नये, तसेच रेल्वे पकडण्यासाठी रूळ ओलांडू नयेत, यासाठी स्थानकांवर उभारलेल्या पायर्‍या, पूल किंवा लिफ्टचा वापर करावा, अशा स्पष्ट सूचना रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जातात. मात्र प्रत्यक्षात या सूचनांचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. शहरातील प्रमुख रेल्वेस्थानकांसह रेल्वे पटरी भागातील स्थानकांवर अनेक प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडताना दिसून येतात. काहीवेळा तर समोरून रेल्वे येत असतानाही जीव धोक्यात घालून रूळ ओलांडले जात आहेत. यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय अनेक प्रवासी गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दारात उभे राहून किंवा बसून प्रवास करताना आढळून येतात. अशातच दारातून खाली पडून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी. रेल्वेच्या दारात बसून प्रवास करू नये, किंवा उभे राहून बसू नये. असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.