स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उचलले पाऊल
पैठण, (प्रतिनिधी): सचिन घायाळ प्रा लि संचलित श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण यांच्याकडे थकीत असलेली ऊस बिलाची रक्कम एक रकमी देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
सचिन घायाळ प्रा.ली. संचलित श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण यांच्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. शेतकरी व कामगार यांच्या थकीत रकमे संदर्भात महसूल विभागातर्फे कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू आहे. कारखान्यातील साखर व इतर मालमत्ता प्रशासनाने जप्त केली आहे. या साखरेच्या व मालमत्ता विक्रीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत उस बिलाची रक्कम देण्यात यावी. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतून व इतर आर्थिक संपत्ती मधून सर्व शेतकऱ्यांची रक्कम देण्यात यावी.
सदर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतून शेतकऱ्यांच्या पूर्ण थकबाकी देणे शक्य न झाल्यास कायद्याच्या चौकटीत राहून जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या मालमत्तेची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. व शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे देण्यात यावे. शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला असताना गेल्या अनेक महिन्यापासून ऊस बिलाची रक्कम थकीत आहे.
त्यांच्या कष्टाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करून सर्व यंत्रणांना निर्देश देऊन आर आर सी ची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांची थकबाकी तात्काळ अदा करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतून शेतकऱ्यांची थकबाकी देणे शक्य न झाल्यास सी.ए. सचिन घायाळ यांच्या सर्व मालमत्तेची जप्त करावी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे.
या जप्तीतून ही शेतकऱ्यांचे पूर्ण देणे शक्य न झाल्यास चेअरमन व संचालक मंडळ यांच्या मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम आठ दिवसाच्या आत देण्यात यावी. नसता शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाच्या रकमेसाठी २२ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
जोपर्यंत शेतकऱ्यांची ऊस बिलाची पूर्ण रक्कम दिली जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आंदोलन दरम्यान निर्माण होणान्या कायदा व सुव्यवस्थेचा तसेच कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास त्यास सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली मुळे यांनी दिला आहे.या ठिय्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. या मागण्याचे निवेदन तहसीलदार ज्योती पवार यांना देण्यात आले.















