औरंगाबाद: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांनी आज क्रांतीचौक येथून भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री राजेंद्र दर्डा, गंगाधर गाडे, आमदार सतीश चव्हाण, नामदेव पवार, कल्याण काळे आदींची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, विविध पक्षाच्या उमेदवारांकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केली जात आहे. आज सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केल्यानंतर, ढोल-ताशे तुतारी आदी वाद्यांसह शंखनाद करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. फुलांनी सजवलेल्या, ‘चला बदल घडवू या’ ‘परिवर्तनाकडून प्रगतीकडे’ अशा आशयाचे पोस्टर्स, भगवे, निळे, पिवळे, हिरवे, झेंडे लावलेल्या गाडीतून उमेदवार सुभाष झांबड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, गंगाधर गाडे, आमदार सतीश चव्हाण, नामदेव पवार, कल्याण काळे, सिद्धांत गाडे आदी मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी जिल्हाभरासह शहरातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदींसह मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी गळ्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे रुमाल व डोक्यावर टोपी असा पेहराव केलेला होता. प्रसंगी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अनिल मालोदे, जितेंद्र देहाडे, काशिनाथ कोकाटे, रवींद्र काळे, इब्राहिम पटेल, पवन डोंगरे, सुधाकर सोनवणे, अभिजित देशमुख, भाऊसाहेब जगताप, मेहबूब भाई, बाबा तायडे, सचिन शिरसाट, राहुल सावंत आदींची उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांमध्ये जोश
काँग्रेस अंतर्गत कलहाचा परिणाम सुभाष झांबड यांच्या समर्थकांवर होणार का? याचे उत्तर आजच्या गर्दीने दिले. सत्तार यांच्या बंडानंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम नसल्याचे आजच्या गर्दीने दिसून आले. मिरवणुकीमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. काँग्रेस पक्षाची निशाणी असलेल्या सोप्या आणि रुमाल गळ्यात टाकून तरुण नंबर तुम आगे बढो च्या घोषणा देत होते. खैरेंच्या मिरवणुकी नंतर शहराचे लक्ष लागून असलेल्या झांबड यांच्या या मिरवणुकीवर राजकीय जाणकारांचे चांगलेच लक्ष होते. या परीक्षेत झांबड पास झाल्याचे बोलले जाते.
पेशवाई ग्रुपचे आकर्षण
यावेळी झांबड यांनी क्रांती चौक येथून काढलेल्या या मिरवणुकीत नाशिक येथील ढोल पथकाने डोक्यावर फेटे हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन झेंडा नृत्य करणारा 120 लोकांचा पेशवाई ग्रुप मिरवणुकीचे मोठे आकर्षण ठरला. या ग्रुपने नाशिक ढोल तुतारी आदी वाद्यांचा गजर करीत शंखनाद देखील केला. यात युवती सुद्धा पारंपरिक नऊवारी पोशाखात शंखनाद करतांना दिसून आल्या.
तांड्यावरील लोकांचे बंजारा नृत्य
प्रसंगी कन्नड येथून सहभागी झालेल्या रुई तांडा, वसंत तांडा, येथील महिलांच्या ग्रुपने पारंपारिक पोषाखात सहभाग नोंदवित तांड्यांची ओळख असलेले बंजारा नृत्य सादर केले.