परवानगी असो नसो, आझाद मैदानावरील उपोषणावर ठाम, मनोज जरांगे यांच्या दौर्‍यात हजारो मराठा बांधव रस्त्यावर, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Foto
पाटोदा : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. काल मंगळवारी अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. मंगळवारी त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता.  त्यानंतर आज त्यांचा मुक्काम श्रीगोंदा इथे असणार आहे मात्र दुपारपर्यंत त्यांनी प्रकृतीमुळे पाटोदा सोडले नव्हते.  दुसरीकडे मुंबई पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली असली तरी आपल्या मुंबईतील उपोषणावर ते ठाम आहेत. प्रवासा दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली असून डॉक्टरांनी रात्री ३ वाजता त्यांची तपासणी केली.

या पार्श्वभूमीवर पाटोद्यात हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील आता खोपोली मार्गे थेट मुंबईला जाण्याची शक्यता आहे. पाटोद्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून जरांगे पाटील यांच्याची चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांनी गाडीबाहेर न येण्ळाचा निर्णय घेतल्याने त्यांच्या कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. 
मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवारी रात्रीचा मुक्काम ठरल्यानुसार बीडच्या पाटोदा येथे होता. मनोज जरांगे पाटील यांची रात्री दोन वाजता बीडच्या पाटोदा चौकात सभा झाली. या सभेला मराठा बांधवांनी तुफान गर्दी केली होती. बीडचा पाटोदा चौक  गर्दीने भरुन गेला होता. 

मनोज जरांगे हे सुरुवातीला मराठा आंदोलकांसह मुंबईत धडकणार होते. मात्र,पोलिसांनी मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारल्याने जरांगे पाटील मोजक्या सहकार्‍यांसह मुंबईला निघाले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना ते मुंबईला जात असताना आशीर्वाद देण्यासाठी यावे, असे आवाहन केले होते. घोषित केल्याप्रमाणे यांचा रात्रीचा मुक्काम पाटोदा येथे होता. नियोजित वेळेपेक्षा खूप उशीर त्यांना पाटोदा येते पोहोचण्यासाठी झाला. दरम्यान रात्री साधारणता दीड वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील हे पाटोदा येथे दाखल झाले. एवढा उशीर होऊन देखील हजारो मराठा समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या. 

पोलिसांकडून मनोज जरांगेंच्या गाडीची तपासणी
मनोज जरांगे हे १५ तारखेला अंतरवाली सराटीवरुन मुंबईच्या दिशेने निघाले होते. काल त्यांचा पहिला मुक्काम बीडच्या पाटोदा येथे होता. ते काल रात्री दोन वाजता पाटोद्यात पोहोचले. तरी त्यांना भेटण्यासाठी हजारो मराठा बांधवांनी गर्दी केली होती. आज मनोज जरांगे पुढच्या मुक्कामाला म्हणजे श्रीगोंद्याच्या दिशेने निघतील. त्यापूर्वी आज सकाळी पोलिसांकडून डॉग स्क्वाडकडून मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीची तपासणी केली जात आहे.

दौरा स्कीप करुन थेट मुंबई गाठण्याचा विचार...
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. दरम्यान उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो. आरक्षण महत्त्वाचे आहे, दौरा महत्त्वाचा नाही. खोपोलीपर्यंत जायचे म्हणजे माणूस जेवण खाऊन असला पाहिजे. मला पुढचा दौरा आता शक्य होत नाही. मी पाटोद्यातून पोलिसांना सांगून मुंबईला जाईल. असे विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सभेत केले, त्यामुळे त्यांची नक्की भूमिका काय हे कळू शकले नाही. 

न्यायालयात धाव घेणार
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांचा आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठीच्या परवानगीचा अर्ज दोनवेळा फेटाळून लावला होता. यानंतर मनोज जरांगे यांनी तिसर्‍यांदा पुन्हा परवानगीसाठी अर्ज केला असून याबाबतही मुंबई पोलिसांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. दरम्यान मुंबई पोलिसांची आतापर्यंतची कार्यपद्धती पाहता परवानगीचा तिसरा अर्जही फेटाळला जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली जाऊ शकते. ते उच्च न्यायालयात याबाबत दाद मागतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनोज जरांगे यांनी यापूर्वी वारंवार न्यायदेवता आपल्या बाजूने आहे, असे सांगितले आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी पाटोद्याहून निघताना मला समाजासाठी मरू द्या असे भावनिक आवाहन केले त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते.