छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): माझ्याशी लग्न केले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत मारून टाकीन, अशी धमकी देत एका २२ वर्षीय परिचारिकेचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या एका विकृत तरुणाला क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंकर कुंडलीक बारगजे (वय २५, रा. विहामांडवा, ता. पैठण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुणीला धमकावून छळणाऱ्या या आरोपीला न्यायालयाने २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी हे आदेश - दिले.
पीडिता ही खासगी रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. २०२३ मध्ये महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली
होती. मित्राच्या माध्यमातून झालेली ओळख पुढे एकतर्फी प्रेमात बदलली. तरुणीने स्पष्ट नकार दिल्यानंतर पाठलाग सुरू केला. आरोपीने
तू माझ्याशी बोलली नाहीस तर दुसऱ्याशी लग्न करू देणार नाही, अशी धमकी देत तो वारंवार त्रास देत होता, असे फिर्यादीत नमूद आहे. २० मे रोजी सकाळी पीडिता रुग्णालयात ड्युटीसाठी जात असताना आरोपी तेथेच थांबून होता. त्याने तिचा हात पकडून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर त्याने पीडितेचा विनयभंग केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












