औरंगाबाद: बीएड, डीएड, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक क्षेत्रात सर्वाधिक विद्यार्थी दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात. परंतु त्यांना रोजगारच नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे आता विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. मागील तीन वर्षांपासून फार्मसी क्षेत्राचे वारे वाहत आहे. त्यामुळे भरमसाठ विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेत आहेत. महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ होत आहे;परंतु काही वर्षांनी या क्षेत्रातही बेरोजगारी वाढेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
१५ वर्षांपूर्वी डीएड, बीएड अभ्यासक्रमाला लाभ-लाख रुपये भरूनही प्रवेश मिळत नव्हता. या क्षेत्रात प्रचंड मागणी वाढली होती. त्यामुळे महाविद्यालयांची संख्या वाढली. परिणामी पदवी घेणार्यांची संख्या जास्त झाली आणि रोजगार मात्र कमी झाले. त्यामुळे बेरोजगारी वाढली. याशिवाय शिक्षकांच्या समस्यांचाही डी.एड, बीएड प्रवेशावर परिणाम झाला अन् बरेचशे महाविद्यालय बंद झाले.
डीएड, बीएडकडे विद्यार्थ्यांची मागणी कमी झाली आणि् अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. विद्यार्थ्यांची मागणी पाहता महाविद्यालयांची संख्याही वाढली. मात्र, या क्षेत्रातही पदवी घेणार्यांच्या तुलनेत रोजगार कमी दिसून आले. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात लाखो रुपये खर्च करूनही अनेकांवर बेरोजगारीच्या यादीत राहण्याची वेळ आली, तर काही विद्यार्थी मात्र अभियांत्रिकी पदवी असताना कॉल सेंटरमध्ये नोकरी करत असल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी या क्षेत्राकडेही आता विद्यार्थी पाठ फिरवित आहेत.
आता फार्मसीचे आले वारे
मागील तीन वर्षांपासून फार्मसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. विद्यार्थ्यांची मागणी पाहता काही संस्था चालकांनी अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक संस्था बंद करून फार्मसी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यावर्षी राज्यात 32 संस्थांना मान्यताही दिली आहे. त्यात विभागातील सात संस्थांना फार्मसी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. यामुळे फार्मसी क्षेत्रातही विद्यार्थी संख्या वाढणार आहे. एवढ्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल का तसेच जागोजागी आता मेडिवकलच सुरू करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. परिणामी फार्मसीत क्षेत्रातही बेरोजगारी वाढेल की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
एकाच क्षेत्रामागे विद्यार्थ्यांचा कल
प्रत्येक क्षेत्रात आज वाव आहे;परंतु विद्यार्थी मात्र एकाच क्षेत्रामागे धावताना दिसत आहे. त्याचा परिणाम बेरोजगारी वाढत आहे. फार्मसी, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, आयटीआय या क्षेत्रातच सर्वाधिक विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. त्यामुळे सर्वाधिक बेरोजगारी वाढताना दिसत आहे. इतर क्षेत्र सध्या ओस पडताना दिसत आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याचाही विचार विद्यार्थी करत नाहीत. नर्सिंग, सी.ए. (चार्टर्ड अकाऊंटंट), बीबीए, एमबीए, वाणिज्य शाखा, फाईन आर्टस् यासारख्या क्षेत्रातही विद्यार्थी चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात. इतकेच नव्हे तर हॉटेल्सची संख्या प्रचंड वाढत आहेत. त्यातही मनुष्यबळाची गरज पडेल;परंतु हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राकडेही विद्यार्थी पाठ फिरवित आहे. त्याचा परिणाम रोजगार असूनही बेरोजगारी असल्याचाच सर्वत्र नारा लावला जात आहे.









