फुलंब्री पोलिसांची गौण खनिज माफियांवर मोठी कारवाई

Foto
४४.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

फुलंब्री, (प्रतिनिधी): फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू साठ्याविरोधात फुलंब्री पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी पोलीस हवालदार अंकुश नानासाहेब बागल (पोहेकों / ११९७), पोलीस स्टेशन फुलंब्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जाबेर शेख शमीम शेख (रा. आळंद), गोविंद शंकर सिंग ठाकूर (रा. पाल), विलास प्रभाकर तुपे, नंदू रवींद्र राऊत आणि अरुण यादव पारखे (रा. महाल किनहोळा, ता. फुलंब्री) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

कारवाईदरम्यान पोलिसांनी एमएच २० - ९५९५ क्रमांकाचा हायवा, त्यामध्ये असलेली अंदाजे दोन ब्रास वाळू, एमएच २० - ८०७४ क्रमांकाचा जेसीबी तसेच घटनास्थळी साठवून ठेवलेली अंदाजे १५० ब्रास वाळू असा एकूण ४४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधातील ही कारवाई फुलंब्री पोलिसांनी केली आहे.

 पुढील तपास पोलीस स्टेशन फुलंब्रीमार्फत सुरू आहे. या कारवाईमुळे गौण खनिज माफियांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.