राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना निवेदन
बिडकीन, (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने युवा शारीरिक शिक्षकांची संच मान्यतेनुसार विशेष शारीरिक शिक्षक क्रीडा पदे पूर्ण क्षमतेने भरावी. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय १५ मार्च २०२४ संच मान्यता निकष मुद्दा क्रमांक ५.४ नुसार क्रीडा शिक्षकांची भरती करावी. तसेच २०२५ चा निकाल जाहीर झालेला असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० महाराष्ट्र राज्यात लागू झालेले आहे. या धोरणाच्या प्रकरण क्रमांक ७मध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक (क्रीडा) नियुक्ती जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळांमध्ये करण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४ नुसार केंद्रशाळांवर शारीरिक शिक्षण शिक्षकांची उपलब्धता अनिवार्य असल्याचे
नमूद आहे.
तसेच शासन निर्णय दिनांक २१ ऑगस्ट २०२५ मधील मुद्दा क्र. १६ नुसार शारीरिक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. याशिवाय, शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४.५ नुसार प्रत्येक २५० विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या मागण्यासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांना छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी क्रीडा शिक्षकांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.
मात्र, मागील २० वर्षांपासून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच
समाजकल्याण विभागातील शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरती झालेली नाही. परिणामी अनेक बी.पी. ई एड, एम.पी.एड पदवीधर उमेदवार बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची नेमणूक अत्यावश्यक असून सध्या व इंग्रजी माध्यम शाळांमध्ये ही पदे भरलेली असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मात्र ती अद्याप रिक्त आहेत.
याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ तर्फे निवेदन देण्यात येत आहेत. यावेळी शारीरिक शिक्षण शिक्षक शेख इलियास, श्रीकांत घोडके, तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष विजय चव्हाण, उपाध्यक्ष भाकचंद कोंथिबीरे, कैलास जाधव, परवेज आतार आदींची उपस्थिती होती.











