चांदीचा मुकुट, मोदक चोरणाऱ्यांना पिशोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली लिंबाजी बीटमधील गणेशपूर येथील श्री जागृत गणपती मंदिरातील गणपतीचा चांदीचा मुकुट व मोदक २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते पहाटे ३ वाजेदरम्यान चोरट्यांनी चोरला होता.

पोलिसांनी या प्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक यांनी गुन्ह्याच्या तपासादरम्यान परिसरातील ३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून सलग चार दिवस तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून आरोपी शिर्डी येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथकाने शिर्डी येथे जाऊन भगवानसिंह दिलीपसिंग परदेशी, (रा. शिर्डी) व अनिल हिरालाल बेडवाल (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना शोधून दोघांना बेड्या ठोकल्या. कन्नड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

पोलीस कस्टडीमध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. शिर्डी येथील मामाकडे चांदीचा मुकुट व मोदक ठेवलेला आहे. पिशोर पोलिसांनी शिर्डी येथील पोलिसांची मदत घेत तेथून चांदीचा मुकुट, मोदक हस्तगत केला. या गुन्ह्यात एकूण तीन आरोपींचा समावेश असून, पिशोर पोलीस अजून एका आरोपीचा शोध घेत आहेत. कन्नड न्यायालयाने दोन्ही आरोपींची हसूल कारागृहात रवानगी केली. 

ही कारवाई सहा. पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, उपविभाग कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. कुणाल सूर्यवंशी, पो. उप. नि. श्याम गवळी, पोलीस हवालदार दत्तात्रय मोरे, पोलीस नाईक फिरोज बरडे, गणेश कवाळ, पवन खंबाट, विजय चांदा, कौतिक सपकाळ, कैलास करवंदे, दत्तू लोखंडे, सुनील भिवसने, संतोष गुनावत, करण म्हस्के, अन्सार पटेल, देवरे, सायबर गुन्हे शाखेचे योगेश तरमाळे, एसडीपीओ कार्यालय, शिर्डी येथील सहायक फौजदार इरफान शेख यांनी केली.