अन्न सुरक्षेशी खेळ पडला महागात; एफडीएने केली कारवाई
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : बजाजनगर येथील 'पिझ्झा हट' आणि खुलताबाद-शिंदोपूर परिसरातील 'शेळके मामा ढाबा' रेस्टॉरंटच्या अन्न सुरक्षेतील गंभीर त्रुटींमुळे प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. व्हेज व नॉनव्हेज खाद्यपदार्थांसाठी एकाच ओव्हनचा वापर, निकृष्ट दर्जाच्या तेलाची जुन्या अन्नासोबतच होणारी सर्रास फेरवापर आणि स्वयंपाकघरात प्रचंड प्रमाणात आढळलेली अस्वच्छता यांसारख्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गंभीर बाबी अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघडकीस आल्या. याआधी दिलेल्या सूचनांनंतरही नियमांचे पालन न केल्याने आणि त्रुटी कायम ठेवल्यामुळे श्रृअ ने दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित
केले आहेत. फूड्स इंडिया लिमिटेड अर्थात पिझ्झा हटमध्ये खाद्यपदार्थांच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या नोंदी आढळल्या नाहीत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष, कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी अपुरी व्यवस्था, स्वयंपाकातील तेलाची नियमित गुणवत्ता तपासणी नसणे आणि फूडग्रेड पॅकेजिंगचे प्रमाणपत्र उपलब्ध नसणे, अशा त्रुटी आढळल्या. साठवणूक क्षेत्रातील कचऱ्याचीही वेळेवर विल्हेवाट लावली जात नव्हती.
विशेष म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांसाठी एकाच ओव्हनचा वापर होत असल्याचे तपासणीत समोर आले. त्याहून गंभीर बाब म्हणजे सर्व पदार्थ व्हेजिटेबल सोयाबीन तेलात तयार केले जातात, असा फलक केला जात असल्याचे निदर्शनास आले.
उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
दोन्ही आस्थापनांना निलंबनाच्या कालावधीत अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री अथवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकले यांनी दिला आहे.
ढाब्यातही आढळल्या अनेक त्रुटी
शेळके मामा ढाब्यात स्वयंपाकघरातील स्वच्छता, कीटकप्रतिबंधक व्यवस्था आणि निचरा व्यवस्थेत त्रुटी आढळल्या. खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्या नव्हत्या; स्वयंपाकघरात पाणी साचत होते. व्हेज-नॉनव्हेज तसेच कच्चे शिजवलेले पदार्थ वेगळे ठेवण्याची योग्य व्यवस्था नव्हती. खाद्यपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि फूडग्रेड पॅकेजिंगचे प्रमाणपत्रही उपलब्ध नव्हते. अन्न साठवणूक क्षेत्रातील कचरा नियमित हटविला जात नव्हता. अन्न हाताळणारे कर्मचारी अप्रन, हातमोजे, शू कव्हर यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने वापरत नसल्याचेही आढळले.













