प्लाझ्मा थेरपी : कोरोना संकटात नवी आशा !

Foto
महिनाभरात १०० गंभीर रुग्णांवर उपचाराचे टार्गेट !
सुक्रे समितीची उद्या बैठक
 कोरोना उपचारात नवी नवी उमेद जागवणारी प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती आता शहरातही सुरू आहे. घाटीचे डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती गठीत करण्यात आली असून येत्या महिनाभरात १०० गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्याचे उद्दिष्ट समितीने ठेवले आहे. उद्या घाटीत समितीची महत्वाची बैठक होत आहे.
कोरोना विषाणूच्या हल्ल्याने गंभीर स्थितीत पोहोचलेल्या रुग्णांना जीवनदान देणाऱ्या दोनच पद्धती सध्या अस्तित्वात आहेत. रेडिमिसिविर इंजेक्‍शनचा डोस आणि प्लाझ्मा थेरपी ! यापैकी रेडमीसिविर इंजेक्शन उपलब्ध होणे सध्यातरी अवघड बाब आहे. मात्र प्लाज्मा थेरपीद्वारे गंभीर अवस्थेतील रुग्णालाही जीवदान मिळू शकते. घाटीतील डॉ. सुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची उद्या महत्वाची बैठक होत आहे. कोरोना विषाणूचा सामना करून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाज्मा गंभीर अवस्थेतील रुग्णांना दिल्या जातो. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनाविषाणूला पराजित करता येते.
दात्यांची प्रतीक्षा !
 दरम्यान शहरात ५० पेक्षा कमी वय असलेल्या आणि कोरोनाला हरवून निगेटिव ठरलेल्या ६५० रुग्णांची लिस्ट सुक्रे समितीकडे आहे. या कोरोना योद्ध्यांचे मन परिवर्तन करून प्लाज्मा दानासाठी तयार करण्याचे मोठे अवघड काम या समितीपुढे आहे. फोन द्वारे अथवा प्रत्यक्ष संपर्क करून या नागरिकांना प्लाज्मा दानाचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सुक्रे यांनी सांगितले.
 कोणताही धोका नाही : डॉ. शिवाजी सुक्रे
दरम्यान प्लाझ्मा दान करण्यात कोणताही धोका नाही. आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून अतिशय सोप्या पद्धतीने रक्तदानासारखे प्लाझ्मा दान करता येते डायबिटीस, हायपर टेन्शन यासह इतर गंभीर आजार असलेल्यांना मात्र प्लाझ्मा दान करता येत नाही. प्लाझ्मा दात्यांमुळे गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे.

मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचे सामाजिक भान !
 दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी प्लाझ्मा दान करून मंत्री मुंडे यांना वाढदिवसाची भेट दिली. गेल्या ११ जून रोजी मंत्री मुंडे यांच्यासह दोन स्वीय सहाय्यक, दोन ड्रायव्हर, दोन बॉडीगार्ड आणि दोन स्वयंपाकी कोरोना बाधित आढळले होते. त्यानंतर प्रशांत जोशी यांनी मुंबईला उपचार घेतले. लक्षणे सामान्य असल्याने १५ जूनला त्यांना सुटी देण्यात आली. १८ जूनला दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात ते निगेटिव्ह आले. त्यानंतर त्यांनी प्लाज्मा दान करण्याचा निर्णय घेतला. काल मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जोशी यांनी प्लाज्मा दान करून आपले सामाजिक दायित्व निभावले.
दोघांचे प्राण वाचवू शकतो प्लाज्मा : जोशी वाढदिवसाच्या दिवशी मुंडे साहेबांना काय भेट द्यावी याचा विचार करत होतो. तेव्हां डॉक्टरांच्या सल्ल्याने प्लाज्मा दान हे सर्वोच्च दान ठरेल, असे समजले. काल अंबाजोगाई येथे प्लाझ्मा दान करून मुंडे साहेबांना वाढदिवसाची भेट दिली आहे. रक्तदाना सारखेच प्लाझ्मा दान सोपे आहे. चारशे मिली रक्तातून काढण्यात आलेल्या प्लाझ्माद्वारे दोन गंभीर अवस्थेतील रुग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी  पुढे यावे असे आवाहन प्रशांत जोशी यांनी केले आहे.