छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला पोलिस कर्मचार्यांनी हटकले. त्यावर सिगारेट घेण्यासाठी आल्याचे लक्षात येताच दोन्ही पोलिसांनी त्यांच्याकडील गाडी बुलढाणा पासिंगची असल्याचा ठपका ठेवत ही चोरीची आहे, असा निष्कर्ष काढला. दुचाकी चोरीची नसल्याचे सांगितल्यावर अंमलदारांनी लाठीने मारहाण करून तरूणाच्या पोटात व छातीत लाथ घातली.
२१ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ शुक्रवारी (दि. २३) व्हायरल झाला. याप्रकरणी जखमी तरुण अक्षय ज्ञानेश्वर ठोकळ (३२, रा. इंदिरानगर, मुकुंदवाडी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. तर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने मुकुंदवाडी ठाण्याचे गणेश वाघ आणि संतोष बिरारे या दोन्ही अंमलदारांना निलंबित केले. २१ जानेवारीच्या रात्री अक्षय आणि त्यांचा मित्र भाऊसाहेब मोरे हे दोघे टीव्ही सेंटर येथून काम करून मुकुंदवाडी चौकात उभे होते. मेवाड हॉटेलजवळील पान शॉपसमोर त्यांना गणेश वाघ आणि संतोष बिरारे यांनी हटकले. तेव्हा भाऊसाहेब याने त्यांना सिगारेट घ्यायची आहे, असे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यांना तुमच्याकडील दुचाकी चोरीची आहे, असे म्हणत तपासणीचा हट्ट धरला. त्यावर अक्षयने बुलढाणा पासिंग असली तरी ही दुचाकी माझ्या मित्राची आहे. तुम्हाला कागदपत्रे दाखवतो, असे सांगितले. मात्र, पोलिस काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
अक्षयला अंमलदार गणेश वाघने काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीत अक्षय खाली पडला. तरीही त्याला काठीने मारहाण करत राहिला. तर अंमलदार बिरारे याने अक्षयच्या छातीत बुटांनी लाथा मारून तुडवले, असा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या मारहाणीत अक्षय ठोकळ यास गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीवर, दंडावर काळेनिळे वळ उमटले असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.










