बदल्या होऊनही पोलिसांचा घरोबा कायम

Foto

औरंगाबाद: पंधरा दिवसापूर्वी पोलीस आयुक्तालयातून पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र काही पोलिस कर्मचारी अध्यापही बदली झालेल्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. अशा घरोबा करून बसलेल्या पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मे महिन्यात शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्याप्रमाणे बदल्या झालेल्या आहेत, त्याप्रमाणे काही पोलीस कर्मचारी संबंधित ठिकाणी रुजूही झाले आहेत. मात्र काही ठाणे प्रमुखांच्या मर्जीतील कर्मचारी बदल्या होऊनही बदली झालेल्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. बदली झालेले आदेश ही त्यांना प्राप्त झाले आहेत. मात्र ठाणे प्रमुख त्यांना अद्याप मोकळीक देण्यास तयार नाही. त्यामुळे असे कर्मचारी कायम ठाणे प्रमुखांची उर्वरीत कामे करून देत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मुख्यता ठाणे प्रमुखांच्या मर्जीतील कर्मचार्‍यांकडे आर्थिक व्यवहाराची कामे असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना वसुली बहादरांची नावे आपआपच समोर आली आहेत. पोलीस आयुक्तांनी यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

नेहमीप्रमाणे आत्ताही काही कर्मचार्‍यांना पाच वर्षे झाली आहेत. तरी ते एकाच पोलीस ठाण्यात आहेत. बदली प्रक्रियेच्या वेळी त्यांनी अडचणी वरिष्ठांना दाखवल्या आहेत. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. घरोबा करून बसलेली काही कर्मचार्‍यांनी गेल्यावर्षी अशाच अडचणी दाखवल्या होत्या.