अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पोलिसांचे धाडसत्र

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरोधात पिशोर पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली असून तीन ट्रॅक्टर पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई वेगवेगळ्या दिवशी करण्यात आली.

७ जानेवारी रोजी २.२० वाजता टाकळी शाहू ते आडगाव रस्त्यावर निळ्या रंगाचा फॉर्मट्रेक कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २० एच.बी. ४०३७) अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला. भारत सुदाम गोराडे (वय २२, रा. म्हसला बुद्रुक, ता. सिल्लोड) हा ट्रॅक्टर चालवत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दि. ९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पळशी बुद्रुक शिवारातील सोळंके वस्ती येथे छापा टाकण्यात आला. यावेळी निळ्या रंगाचा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर चालक फरार झाला असून ट्रॅक्टर मालक व अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास पळशी बुगा शिवारातील भगवान गायकवाड यांच्या शेताजवळ पांढऱ्या भगव्या रगाचा ट्रॅक्टर (क्र. एम. एच. २० जी. व्ही. १७५४) अवैध वाळू वाहतूक करताना पिशोर पोलिसांना मिळून आला. सागर कारभारी जाधव व बापू देविदास नलावडे (रा. पळशी बुद्रुक ता. कन्नड) यांच्या ताब्यातील या ट्रॅक्टरमधून विनापरवाना शासनाची एक ब्रास वाळू चोरट्या पद्धतीने वाहतूक केली जात होती. याप्रकरणी पोलीस ठाणे पिशोर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री याच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजीराव नागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पिशोर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्याऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अवैध वाळू वाहतुकी विरोधात कठोर कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारापोलिसांनी दिला आहे.