छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : केटरिंग व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दांड्याने बेदम मारहाण करत लुटले होते. खिशातील ५६ हजारांची रोकड, कानातील दोन सोन्याच्या बाळ्या, मोबाईल लुटून पसार झाले होतें. ही घटना १८ मार्चला सायंकाळी हॉटेल प्रभूच्या मागे, लिंक रोडवर घडली. दरम्यान, सातारा पोलिसांनी लूटमार करणार्या टोळीतील पवन ज्ञानेश्वर झळके (३०), अक्षय कैलास झळके (२२) या दोघांना अटक केली. तर युवराज ऊर्फ पंड्या चरण मेहेर (सर्व रा. वळदगाव) पसार असून, चौथा विधिसंघर्षग्रस्त बालक आहे.
फिर्यादी सागर प्रकाश सरदार (३२, रा. वेदांतनगर), केटरिंगचा व्यवसाय करतात, त्यांना आरोपींनी वास्तुशांतीच्या जेवणाची ऑर्डर द्यायची आहे, असे सांगून १८ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास लिंक रोडवरील प्रभू हॉटेलच्या मागील निर्जन ठिकाणी बोलावले. तिथे पोहोचताच चौघांनी सागर यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर लाकडी दांड्याने त्यांना मारहाण करून त्यांच्या कानातील ४ ग्रॅम सोन्याच्या बाळ्या, मोबाईल आणि रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले होते. सातारा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
तांत्रिक पुरावे आणि आरोपींनी वापरलेल्या सिमकार्डच्या आधारे पोलिसांनी पवन व अक्षय झळके यांना अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी आणि सहाय्यक आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, सपोनि शैलेश देशमुख, पोउपनि गोविंद एकीलवाले, नंदकुमार भंडारे, दिगंबर राठोड, संदीप चिंचोले, सुनील बेलकर, सचिन काळे, सुरेश काळे, कल्याण निकम आणि सुभाष पाचे यांच्या पथकाने केली.









