औरंगाबाद : पाण्याकरिता अयोध्यानगर येथील नागरिकांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी अशोक पद्मे याना घेराव घातला असता, पद्मे यांनी शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात तक्रार देण्याकरिता नागरिकांनी सिडको पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार आज दुपारी 12.30 वाजता घडला. जायकवाडी कडून शहरात येणारे पाणी 20 एमएलडी कमी झाल्याने शहरात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे. पाण्याकरिता शहरात विविध ठिकाणी विविध आंदोलने गेल्या काही दिवसात पाहायला मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून पाण्याचा प्रश्न जैसे थेच असल्याने अधिकारी सातत्याने केवळ आश्वासने देत आहे. आज सोमवारी आयोध्या नगर येथील नगरसेविका सुरेखा खरात व नागरिकांना पाणीपुरवठा विभागातील अधिकारी अशोक पद्मे यांना घेराव घालीत प्रश्न सोडवण्याची मागणी केली. परिसरात नळाला पाणी येत नाही. टँकरने देखील प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात नाही त्यामुळे पाणी द्या किंवा नियोजन होत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. दरम्यान अधिकारी पद्मे यांनी धमकी दिल्याचा आरोप करीत परिसरातील नागरिकांनी पद्मे यांच्याविरोधात तक्रार देण्याकरीता थेट सिडको पोलिस ठाणे गाठले. वृत्त देई पर्यंत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. यावेळी नगरसेविका सुरेखा खरात, राहुल खरात, सतीश खेडकर व परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.