Police parade in the backdrop of elections

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शांततापूर्ण व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सोमवारी (दि.१२) शहर पोलिसांच्या वतीने पथसंचालन (रूट मार्च) करण्यात आले. 

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या या संचलनाद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कडक इशारा देण्यात आला असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत उपायुक्त (परिमंडळ-१) पंकज अतुलकर, (परिमंडळ-२) प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) अशोक राजपुत आणि मनोज पगारे या वरिष्ठ अधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती. हे पथसंचलन नारेगाव येथून सुरू होऊन बीबी का मकबरा येथे संपन्न झाले. एम-सिडको, सिडको, जिन्सी, सिटी चौक आणि बेगमपुरा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून हे संचलन पार पडले. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानान कल्याणकर, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, सोमनाथ जाधव, गीता बागवडे, शिवाजी बुधवंत, मंगेश जगताप, राखीव पोलिस निरीक्षक प्रल्हाद राठोड यांच्यासह ११ सहायक निरीक्षक-उपनिरीक्षक, ४६० पोलिस अंमलदार, एसआरपीएफचे १९० अधिकारी व जवान सहभागी झाले होते.

निर्भयपणे मतदान करावे : आयुक्त
शहरातील मुख्य रस्ते, चौक, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरातून पोलिसांनी संचलन करत परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दल पूर्ण तयारीनिशी सतर्क आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे. आचारसंहितेचे उल्लंघन करणार्‍या किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.