▶ ४.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी फरार
▶ १३० किलो गोवंश मांस, ट्रॅक्टर, कुऱ्हाड व चाकू जप्त
▶ वडोद बाजार पोलिसांची धडक कारवाई
फुलंब्री, (प्रतिनिधी) : रिधोरा देवी शिवारात सुरू असलेल्या कथित गोवंश हत्येच्या प्रकारावर वडोद बाजार पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई करत अंदाजे ४ लाख ८९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते घटनास्थळावरून पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी रात्री १०.५० वाजण्याच्या सुमारास रिधोरा देवी शिवारात काही जण गोवंश हत्या करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. या कारवाईत दोन पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये भरलेले अंदाजे १३० किलो गोवंश मांस, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, लोखंडी कुऱ्हाड व लोखंडी चाकू असा एकूण ४ लाख ८९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी एएसआय मलखानसिंग सिताराम नागलोत (पोलीस ठाणे वडोद बाजार) यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिरसागर, एएसआय मलखानसिंग नागलोत, शिवनाथ दराडे व धनराज खाकरे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास एएसआय जारवाल करीत आहेत.












