चिप्स पॅकेटवरून पोलिसांनी शोधला खुनाचा आरोपी, पोलिसांनी ५२ हजार फोन मधून शोधला खुंखार आरोपी

Foto
नागपूर  : नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका महिलेवर झालेला अत्याचार आणि हत्याकांडाची उकल केली आहे. दहा दिवसांपूर्वी संबंधित महिलेवर एका अज्ञाताने अत्याचार केला होता. अत्याचारानंतर त्याने महिलेचं डोकं ठेचून तिची हत्या केली होती. ही हत्या कुणी केली? याचा कोणताही पुरावा किंवी सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांकडे नव्हता. मात्र सलग दहा दिवस अथक मेहनत घेत पोलिसांनी हा बलात्कार आणि खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

सावनेर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच बरोबर ५२ हजार फोन नंबरची देखील तपासणी केली. या प्रकरणात मृत महिला ही पूर्णपणे अनोळखी असल्याने त्याचबरोबर आरोपीबाबत कोणताही धागेदोरे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा प्राथमिक पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे तपास हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखा, सावनेर पोलीस स्टेशन, केळवद पोलीस स्टेशन आणि सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला.
या संपूर्ण तपासादरम्यान (मारवल) या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेली महत्त्वाची कार्यवाही करण्यात आली आहे. मृतक महिलेचा चेहरा सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तिच्या चेहर्‍याची पुनर्रचना करण्यात आली.

एखाद्या गवताच्या पेंडीतून सुई शोधण्याइतका बारीक तपास करत नागपूर ग्रामीण पोलिसांनी भिक्षेकरी महिलेवर झालेल्या या बलात्कार आणि हत्येचा प्रकरणाचा उलगडा केला आहे. मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या एका चिप्स पॅकेटवरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांनी एआयच्या मदतीने गुन्हाची उकल केली आहे. तब्बल १० दिवसांनी जरी या प्रकरणाचा छडा लागलेला असला आणि नराधम आरोपीला अटक झाली असली तरी हत्या झालेल्या भिक्षेकरी महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

धक्कादायक म्हणजे या अटक आरोपीवर याआधी सुद्धा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सुधाकर मंडपे असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सावनेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो विवाहित असून, २१ वर्षांपूर्वी त्याच्या विरुद्ध एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता.

या अत्याचार आणि हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांना घटनास्थळी एक चिप्स पॅकेचा छोटा तुकडा आढळून आला होता. पोलिसांनी त्या भागात चिप्सचे वितरकांना बोलावून घेतले आणि कुणी या भागात गेल्या काही दिवसात चिप्स विकत घेतलेत का? ऑनलाइन पेमेंट केलाय का? असा बारीक शोध सुरू केलेला होता. यातूनच पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलं.