लाच प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकाला सक्तमजुरी

Foto
लाच प्रकरणात पोलिस 
उपनिरीक्षकाला सक्तमजुरी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कोविड लॉकडाऊन काळात तंबाखू व पान मसाला विक्री प्रकरणात मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या तत्कालीन पोलीस हवालदार तसेच सध्याचा सहायक पोलीस उपनिरीक्षकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी ४ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा शुक्रवारी (दि.६) ठोठावली. यमाजी लक्ष्मण खटाणे (५७, रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) असे या लाचखोराचे नाव आहे. या प्रकरणात ३६ वर्षीय प्लंबरने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, लॉकडाऊनमुळे ३ मे २०२० रोजी तंबाखू व पान मसाला इंदिरानगर परिसरात विक्री करत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास पुंजाबाई चौकाजवळ दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना अडवले व त्यानंतर शिवाजीनगर पोलिस चौकीत नेण्यात आले. दरम्यान, हवालदार खटाणे याने प्रकरणात मदत करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली. यामुळे फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून खटाणे याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर एसीबीचे पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता अनिल हिवराळे यांनी युक्तीवाद करुन साक्षीदारांचे जबाब नोंदवले. न्यायालयाने प्रकरणात दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. प्रकरणात एसीबीचे निरीक्षक केशव डींडे व हवालदार बी. एच. थोरात यांनी पैरवीचे काम पाहिले.