संभाजीनगर, छत्रपती - (सांजवार्ता ब्युरो) : वाहतूक - पोलिसांशी नजरानजर झाली अन - सराईत गुन्हेगारांनी दुचाकी टाकून पळ काढला, मात्र पोलिसांनी - चोराचीच दुचाकी घेऊन सिनेस्टाइल पाठलाग करत त्याला पकडले. ही थरारक कारवाई मंगळवारी (दि. ७) - दुपारी अडीचच्या सुमारास पैठणगेट -परिसरात घडली.
राहुल रमेश लाटे (वय २२, रा. शताब्दीनगर) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहर वाहतूक शाखा २ चे सहायक निरीक्षक सुनील कन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बोडेले, हवालदार दुल्हत आणि अंमलदार संदीपान धर्म यांचे पथक पैठण गेट ते बारा भाई ताजिया मार्गावर नो-एन्ट्री तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत होते. याच वेळी एका दुचाकीवरून येणारे दोन तरुण पोलिसांच्या नजरेत भरले, थांबण्याचा इशारा करताच दोघांनी दुचाकी सोडून पळ काढला. पोलिसांनी त्यांच्याच सोडलेल्या दुचाकीचा वापर करून पाठलाग केला. काही अंतरावर राहुल लाटे याला पकडले, तर त्याचा साथीदार पसार झाला. दरम्यान, तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून दुचाकीवरील नंबर प्लेट बनावट असल्याचे तसेच वाहन चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.














