चोरीस गेलेला आयशर पोलिसांनी ५० मिनिटांत शोधला

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): देवगाव रंगारी गेल्या काही महिन्यांपासून घरासमोरील उभे असलेले आयशर वाहन पहाटेच्या अंधारात अचानक दिसेनासे झाले, हा प्रकार आयशर चोरीचा असल्याचे लक्षात येताच मालकाने तात्काळ जागरूकता दाखवत वाहनास लावलेले जी.पी.एस. प्रणाली तपासले असता आयशर देवगाव रंगारीकडे जात असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती देताच अवघ्या ५० मिनिटात पोलिसांनी त्याचा शोध लावला.

ती माहिती डायल ११२ वर दिली. पोलिसांनी तत्काळ आयशरचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागावर असल्याचे लक्षात आल्याने चोरट्यांनी झोलेगाव पाटीजवळ आयशर उभा करून पळ काढल्याचा पन्नास मिनिटांचा सिनेस्टाईल थरार शनिवार २४, रोजी पहाटे देवगाव रंगारी येथे पाहावयास मिळाला.

सात लाख रुपये किमतीचा चोरीस गेलेला आयशर व त्यात चोरीची एक दुचाकी असे टायमिंग जुळून आल्याने अवघ्या पन्नास मिनिटांत मिळाले. देवगाव रंगारी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. सतीश भीमराव काळे ता. गदाना (ता. रत्नपूर, ह.मू. सजापूर, वडगांव गट नं. १०. वाळुज) हे आयशर चालक असून, त्यांच्या नावे असलेला आयशर (महा. ४ एच. वाय. ५३५३) हा गेल्या काही महिन्यांपासून घरासमोर रिकामा उभा केलेला होता. आयशर चोरीस गेल्याचे लक्षात येताच समृद्धी महामार्गावरून येणारे नातेवाईक प्रमोद सुपडू जाधव, देवगाव रंगारी येथील आयशरचालक मालक संघटनेचे अफसर शहा यांना माहिती दिली.

त्यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप दिवेकर यांच्या मदतीने देवगाव रंगारी पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, पोलीस कर्मचारी वाहन चालक मनोज लिंगायत, सहा. फौजदार भीमराज चेळेकर आदींनी एकामेकांना संपर्क करीत जी.पी. एस. लोकेशन घेत चोरीस गेलेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरचा सिनेस्टाईल पाठलाग केला.

दुचाकी व आयशर आयशरमालकाने जागरूकता दाखवत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जी.पी. एस. प्रणाली, डायल ११२ चा प्रभावी वापर करीत पहाटेच्या अंधारात आयशरचालक मित्रांचे मिळालेले सहकार्य व क्षणाक्षणाला एकामेकांशी संपर्क असल्यामुळे चोरीस गेलेल्या आयशरचा छडा अवघ्या ५० मिनिटांत लागल्याने मोठे नुकसान टळले. रस्त्यावर वाहने चालवताना सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी केले.

वाहनाची कागदपत्रे पूर्तता केल्यानंतर वाहने मूळ मालकास देण्यात येणार आहेत. देवगाव रंगारी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सहा. फौजदार भीमराज चेळेकर, पो.हे.कॉ. मनोज लिंगायत यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ग्रामपंचायत सदस्य प्रदीप दिवेकर, आयशरमालक सतीश काळे, बाबासाहेब मोगल, प्रमोद जाधव, अजय मोगल, गोकुळ काळे, विष्णू काळे, वैभव मोटे, अप्पासाहेब पवार, संदीप सोनवणे, मुजीब सय्यद अफसर शहा, कमलाकर चौधरी आदींनी स्वागत केले.