छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गुन्हेगारांच्या चाकूहल्ल्याच्या घटना दररोजच्या झालेल्या असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने शिंदे सेनेच्या उपविभाग प्रमुखाच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. ही खळबळजनक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात उपविभाग प्रमुख विकास नरवडे आणि त्यांची आई हे गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुंडलिकनगर रोडवरील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. नरवडे आणि संबंधित पोलीस कर्मचारी हे एकमेकांचे शेजारी आहेत. प्राप्त माहितीनुसार, महापालिका निवडणुकीच्या काळापासून या दोघांमध्ये राजकीय कारणावरून धुसफूस सुरू होती. पोलिसाने आपले घर एका विशिष्ट पक्षाच्या प्रचारासाठी भाड्याने दिले होते, तर नरवडे यांनी ते शिवसेनेच्या कार्यालयासाठी मागितले होते.
पोलिसांसमोरच पुन्हा हल्ला
धक्कादायक बाब म्हणजे, वादाची माहिती
मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीतच आरोपी पोलिसाने नरवडे यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
कठोर कारवाईची मागणी
घटनेची माहिती मिळताच उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव
घेतली. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला.
कठोर कारवाई करा : जंजाळ
संबंधित पोलीस कर्मचारी हा वादग्रस्त असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जंजाळ यांनी केली. सध्या जखमी नरवडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















