नागपूर : ५०० कोटींच्या आरोपावरून मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपवरून राज्यातलं राजकारण तापले आहे. आता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जी काही ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्याची फॉरेन्सिक तपासणी होईल असं सांगत त्यांनी जरांगेंनाही एक प्रश्न विचारला आहे.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विषयावर भाष्य केले. शिंदेसेनेच्या नेत्यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समोर आलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होईल असे आश्वासन मी त्यांना दिले आहे. आम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे. अडीच वर्षानंतर हे संभाषण बाहेर येण्यामागे नेमके हेतू काय आहेत, कुणाला टार्गेट केले जातंय यासारखे अनेक प्रश्न आहे. निश्चितपणे या चौकशीची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळासह भाजपानेही चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे निश्चित याची पूर्ण चौकशी करून यातील सत्य आम्ही बाहेर काढू असं त्यांनी म्हटलं आहे.
तर संबंधित ऑडिओ क्लिपची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून होईल. सायबर सेल, फॉरेन्सिक लॅबमध्येही याचा तपास होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. यामागे राजकीय षडयंत्र असून त्यातून महायुतीच्या नेत्यांमध्ये तेढ निर्माण व्हावेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा राजकीय डाव आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर जे काही सत्य असेल ते समोर येईल असं विधान माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, या प्रकरणात आम्हाला आंदोलन करावे लागेल. ५०० कोटी दिलेत असं भाजपाचे नेते बोलताहेत. मग हे ५०० कोटी गेले कुठे? एसआयटी तपास करणार म्हणजे तुमचा दांडिया, तुमचाच ढोल, यापलीकडे काही नाही. आतापर्यंत ११२ एसआयटी स्थापन केलेत. फक्त एसआयटी स्थापन करण्याचं काम करतात. एसआयटीचा खेळ चालवलाय का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.