अमित शाह यांच्या पुणे दौर्‍यात राजकीय खलबते !! मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा

Foto
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौर्‍यावर असून त्यांच्या या दौर्‍याला केवळ औपचारिक कार्यक्रमाचे स्वरूप राहिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याशीही त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची शक्यता, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संभाव्य फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेले ङ्गऑपरेशन टायगरफ या घडामोडींना या दौर्‍यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. या विधेयकासाठी संसदेत आवश्यक असलेले राजकीय समर्थन आणि खासदारांची जुळवाजुळव याबाबत भाजपकडून विविध पक्षांशी संवाद साधला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या भूमिकेचीही चाचपणी केली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर शरद पवार यांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या पुणे दौर्‍यातील बैठकांना केवळ राज्यापुरते मर्यादित न ठेवता आगामी राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भातही पाहिले जात आहे.

दिवंगत अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांची उपस्थिती आणि राजकीय संवादाकडेही लक्ष लागले आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे केली आहे. तर शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेमुळे शिवसेनेतील संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौर्‍यातील भेटीगाठी आणि त्यातून समोर येणारे राजकीय संकेत महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.

विशेष म्हणजे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला असला, तरी या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांमध्ये सरसकट ५० जागांची वाढ करणार असेल, तर आमचा पक्ष पाठिंब्याबाबत विचार करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, नियोजित विधेयकात असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांचा पक्ष इंडिया आघाडीसोबतच राहील, अशी भूमिका मांडली आहे. इंडिया आघाडी सोडून स्वतंत्र भूमिका घेणे शरद पवार यांच्यासाठी अवघड असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.