राज्यातील 14 मतदारसंघांसह देशात 117 जागांवर मतदान सुरू

Foto


लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात आज सकाळी सातपासून महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांसह देशात 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण 117 मतदारसंघांत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. सुमारे अडीच कोटी मतदार 249 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानयंत्रात बंद करणार आहेत. मतदान सुरू होताच अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला. मतदानासाठी बर्‍याच ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून आले.

पश्‍चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे क्रूड बॉम्बच्या हल्ल्यात तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले.झारखंड-छत्तीसगड सीमेवर बलरामपूर येथे बंदरचुआ भागात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्‍लिकार्जुन खरगे, शशी थरूर, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, अभिनेत्री जयाप्रदा, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, अनंत गीते, श्रीपाद नाईक तसेच वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवेे आदी अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य आज इव्हीएममध्ये बंद होणार आहे. तिसर्‍या टप्प्यात गुजरातमधील सर्व २६, केरळमधील २०, महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये प्रत्येकी १४ तर उत्तर प्रदेशातील १०, छत्तीसगडमधील ७ व बिहारमधील५, गोव्यातील २ आणि दादरा नगर हवेली तसेच दमण आणि दीवच्या एका जागेसाठी मतदान सुरू आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा हे गांधीनगरमधून निवडणूक लढवित असून, त्यांच्याविरुद्ध कॉँग्रेसचे आमदार सी. जे. चावडा मैदानात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी या आपल्या नेहमीच्या मतदारसंघाबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातूनदेखील यावेळी निवडणूक लढवित आहेत. २०१४ साली या ११७ पैकी ७१ जागा भाजपप्रणित रालोआने जिंकल्या होत्या. त्या कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजप व काँग्रेसप्रणित आघाडीशी चुरशीची लढत होत असून, काही ठिकाणी सपा, बसपा, माकप तसेच प्रादेशिक पक्षांशी सामना होत आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, जळगाव, रावेर, पुणे, बारामती, अहमदनगर (दक्षिण), माढा, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १४ मतदारसंघात मतदान सुरू आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे आ. सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यासह एकूण २३ उमेदवार रिंगणात असून, जालना मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे विलास औताडे यांच्यात लढत होत आहे. पुणे मतदारसंघात अन्‍न व नागरी पुरवठामंत्री भाजप नेते गिरीश बापट, काँग्रेसचे मोहन जोशी, रायगडमध्ये शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, भाजपच्या कांचन कुल, मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पार्थ पवार, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, जळगावात भाजपचे आ.उन्मेष पाटील, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर, रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे, काँग्रेसचे उल्हास पाटील, सांगलीमध्ये भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील, सातारा येथे राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, शिवसेना-भाजप महायुतीचे नरेंद्र पाटील, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेनेचे धैर्यशील माने, अहमदनगरमध्ये भाजपचे डॉ.सुजय विखे-पाटील, राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप आदी दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील ज्या १४ ठिकाणी मतदान होणार आहे, त्यातील ६ जागा २०१४ साली भाजपने जिंकल्या होत्या. शिवसेनेला तीन, राष्ट्रवादीला चार तर एक स्वाभिमानीला मिळाली होती.