सहाव्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट !

Foto
 
नवी दिल्‍ली: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्‍ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल अशा सात राज्यांतील 59 जागांसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानादरम्यान पश्‍चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. भाजप उमेदवार भारती घोष यांच्या कारवर हल्‍ला करून कारची तोडफोड करण्यात आली. बंकुरा येथे भाजप व तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. 59 मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 30 टक्के मतदान झाले होते.सहाव्या टप्प्यात नवी दिल्‍लीतील सर्व 7 जागांवर तसेच उत्तर प्रदेशातील 14, मध्य प्रदेशातील 8, बिहारमधील 8, पश्‍चिम बंगालमधील 8, हरियाणातील 10  लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते राधा मोहन सिंह, डॉ. हर्षवर्धन, मनेका गांधी, कृष्णपाल गुर्जर, राव इंद्रजितसिंह, नरेंद्रसिंह तोमर तसेच गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी, काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, बॉक्सरपटू विजेंदर सिंह, गायक हंसराज हंस, राघव चढ्ढा, आपच्या आतिशी मार्लेना, भूपिंदरसिंह हुडा, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आदी दिग्गज नेत्यांसह एकूण  979 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे. 

  या टप्प्यात भाजप, काँग्रेस, सपा, बसपा, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग़्रेस, राष्ट्रीय जनता दल, संयुक्‍त जनता दल आदी पक्षांच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्याने त्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत या 59 पैकी 44 जागा भाजपने, तर 2 जागा एनडीएच्या मित्रपक्षाने तर काँग्रेसने 2, तृणमूल काँग्रेसनने 8, भारतीय राष्ट्रीय लोकदलाने 2 व समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली होती. गेल्या वेळी जिंकलेल्या 44 जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. राजधानी दिल्‍लीत भाजप, आप व काँग्रेस यांच्यात तिहेरी लढत होत आहे  आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मतदानाचा वेग कमी होता. 

नंतर अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी दिल्‍लीत राष्ट्रपती भवन परिसरातील डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयातील मतदान केंद्रावर पत्नी सविता कोविंद यांच्यासोबत रांगेत उभे राहून मतदानाचा हक्‍क बजावला. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माजी क्रिकेटपटू व पूर्व दिल्‍ली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार गौतम गंभीर, दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसच्या उत्तर पूर्व दिल्‍ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शीला दीक्षित, दिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, भाजपचे दिल्‍ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह अनेक बड्या व्यक्‍तींनी रांगेत उभे राहून मतदान केले.सोनिया गांधी यांनी दिल्‍लीत निर्माण भवन, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी औरंगजेब लेन येथील शाळेत, प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी लोधी इस्टेट, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने हरियाणातीलगुरुग्राममध्ये मतदानाचा हक्‍क बजावला.