उद्या 51 मतदारसंघात मतदान; सोनिया, राहुल गांधी, राजनाथसिंह, स्मृती इराणींची प्रतिष्ठा पणाला !

Foto


दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या सोमवारी देशातील सात राज्यांतील 51 मतदारसंघात मतदान होणार असून, एकूण 674 उमेदवार रिंगणात आहेत. केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते राजनाथसिंह, काँग्रेसप्रणित संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा, अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य उद्या इव्हीएममध्ये बंद होणार आहे.शनिवारी सायंकाळी या 51 मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पाचव्या टप्प्यात 6 मे रोजी उत्तर प्रदेशातील 14, राजस्थान 12, मध्य प्रदेश 7, ओडिशा 6, पश्‍चिम बंगाल 7, बिहार 5, जम्मू-काश्मीर 2, झारखंडमधील 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 96 हजार मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये एकूण 8 कोटी 75 लाख 88 हजार 722 मतदारसंख्या आहे. मतदानासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पाचव्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या 51 मतदारसंघांपैकी 39 मतदारसंघ भाजपच्या, 7 मतदारसंघ तृणमूल काँग्रेसच्या व 2 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. लोकजनशक्‍ती पार्टी, राष्ट्रीय लोकसमता पार्टी व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. पाचवा टप्पा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून, त्यापैकी 12 मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत. मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा कायम राखण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद ताकद पणाला लावली आहे. यावेळी भाजपसमोर सप-बसप युती व काँग़्रेसने भाजपपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. रायबरेलीच्या विद्यमान खासदार सोनिया गांधी व अमेठीचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात लढत आहे. लखनौमधून गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत, तर राजस्थान तसेच मध्य प्रदेशमध्ये सध्याच्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे. मध्य प्रदेशातील टिकमगड, दमोह, खजुराहो, रेवा, सतना, होशंगाबाद आणि बेतुल सात मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे खासदार आहेत. पाचव्या टप्प्यात बिहारमधील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. बिहारमध्ये भाजपची स्पर्धा राष्ट्रीय जनता दलशी होणार आहे. त्यासोबतच स्थानिक पक्ष विकासशील इन्सान पार्टीचेदेखील भाजप, काँग्रेस व राजदला आव्हान असणार आहे. सारन मतदारसंघात भाजपचे राजीवप्रताप रूडी विरुद्ध राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका राय यांच्यात काट्याची टक्‍कर होत आहे. झारखंडमध्ये यावेळी चुरशीच्या लढती होत असून, दोन माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी व अर्जुन मुंडा हे यावेळी लोकसभेसाठी आपले नशीब अजमावत आहेत. हजारीबागमधून भाजपचे जयंत सिन्हा निवडणूक लढवत आहेत.लोकसभा निवडणुकीत सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, दिल्‍ली आदी 7 राज्यांतील 59 मतदारसंघात तर अखेरच्या सातव्या टप्प्यात 19 मे रोजी बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल या आठ राज्यांतील 59 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. उर्वरित दोन टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 118 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.