गंगापूर येथे राजीव गांधी चौकातील स्मारकाची दुरवस्था, काँग्रेसच्या निवेदनानंतर नगरपालिका प्रशासनाची कारवाई

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) शहरातील अत्यंत महत्त्वाच्या व ऐतिहासिक राजीव गांधी चौक परिसरातील स्मारकाची झालेली दुरवस्था, अनधिकृत होर्डिंग्ज तसेच अतिक्रमणाकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गंगापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषद प्रशासनास निवेदन देण्यात आले. 

यावेळी पदाधिकाऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत परिसराची तातडीने स्वच्छता करून अतिक्रमण व अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची मागणी केली. काँग्रेस तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनाची नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत राजीव गांधी चौक परिसरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली असून स्मारकाच्या आवारात स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

ऐतिहासिक व सार्वजनिक महत्त्व असलेल्या या चौकाचे सौंदर्य आणि स्मारकाची प्रतिष्ठा कायम राहावी, परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये तसेच अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड, बद्रीनाथ बारहाते, बनकर, नंदकिशोर बागल आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.