५०० हून अधिक राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान
छत्रपती : संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि अनेक आव्हानांवर मात करत भारतीय संघात स्थान मिळवणे आणि अर्जुन पुरस्कारापर्यंत पोहोचणे हा प्रवास सोपा नव्हता. मात्र मेहनत, सातत्य, शिस्त आणि खेळाप्रती निष्ठा असेल तर कोणतीही परिस्थिती आपल्या ध्येयाच्या आड येऊ शकत नाही. त्यामुळे नवोदित खेळाडूंनी परिस्थितीसमोर न झुकता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असा
प्रेरणादायी संदेश भारतीय खो-खो संघाच्या माजी कर्णधार व अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे यांनी दिला.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी क्रीडा भारती, देवगिरी प्रांत आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
भानुदास चव्हाण सभागृहात खेळाडू सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४४ आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह ५०० हून अधिक राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये दिव्यांग खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी भूषविले, तर ऑलिम्पिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन मुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यास महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सतीश इंगळे, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव अॅड. गोविंद शर्मा, क्रीडा अधिकारी खंडू यादव, अनिल मिरकर, गणेश बेतूडे पाटील, महेश इंदापूरे, अमृत बिराडे, संतोष अवचार यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. आभारप्रदर्शन डॉ. दिनेश वंजारे यांनी केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












